
महाराष्ट्र राज्य शासनाने आज प्रशासकीय स्तरावर मोठा निर्णय घेत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एकूण २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल झाले आहेत. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमधील प्रशासकीय नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हा मोठा फेरबदल मानला जात आहे. येथील महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली नवी मुंबईत ‘जल जीवन मिशन’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली असून, त्यांच्या जागी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे पदभार स्वीकारतील. त्याचप्रमाणे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (अकोला) येथे रवानगी करण्यात आली असून, त्यांच्या जागी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि नागपूर विभागांतही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. विजय राठोड यांची वर्णी लागली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी आता डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासोबतच, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त पदी श्रीमती संजिता महापात्रा यांची नियुक्ती झाली असून, मावळते आयुक्त सत्यम गांधी यांची बदली अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी राज्य सरकारने अनेक तरुण अधिकाऱ्यांकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. यामध्ये श्रीमती मिनू पी.एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या CEO पदी, तर जस्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची बदली मुंबईत एमआयडीसी (MIDC) च्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाली असून, त्यांच्या जागी डॉ. भारत बस्तेवाड हे लातूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. सर्व बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ आपला नवीन पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




