
राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचेही दृश्य समोर आले आहे. तसेच पुण्यात गुरुवारी (दिनांक 3 एप्रिल) अतिवृष्टी सदृश पाऊस पडला. या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाचे अपयश म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, पुण्यात काल झालेला पाऊस ‘क्लाऊडबर्स्ट’ किंवा 4 तासांत झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता. मात्र ह्या पावसाने प्रशासनाचे अपयश अधोरेखित केले. पाण्याच्या तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नव्हती. त्यामागचे मूळ कारण म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून सरकार आणि सत्ताधाऱ्यांनी पर्यावरणीय धोक्याच्या चिन्हांकडे केलेले सातत्यपूर्ण दुर्लक्ष, अशी टीका त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मागील 4 वर्षांपासून पर्यावरण तज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरीक सातत्याने विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत. अशा अव्यवहार्य प्रकल्पांमध्ये, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, चुकीच्या ठिकाणी उभारलेले मेट्रो खांब, नदीपात्रातील अतिक्रमणे, नदीच्या रेड आणि ब्लू फ्लड लाईन्समध्ये केलेले बदल, वेताळ टेकडीच्या नाशाचा प्रस्ताव, हे सर्व मुद्दे वारंवार मांडण्यात आले आहेत. पुन्हा एकदा स्पष्ट करतो, फक्त काँक्रीट ओतणे म्हणजे विकास नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, गेल्या दशकभरापासून पुण्यात ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असूनही, हा कथित विकास प्रत्यक्षात संकटच ठरत आहे. जर हा तथाकथित विकास असाच सुरू राहिला, तर पुण्याला अशा परिस्थितींना अनेकदा सामोरे जावे लागेल आणि ‘विकास’ नावाखाली केवळ मृगजळ दाखवले जाईल. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 2021 मध्ये पर्यावरण मंत्री म्हणून, मी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट थांबवून तो पुण्याच्या गरजेनुसार पुन्हा आखण्याचे निर्देश दिले होते. नदीच्या नैसर्गिक व मूळ रेड-ब्लू फ्लड लाईन्स पुन्हा निश्चित करणे अत्यावश्यक आहे. सलीम अली पक्षी उद्यान पुनर्जीवित केले होते, जे आज पुन्हा ढिगाऱ्यांनी भरले जात आहे. वेताळ टेकडी आणि इतर मोकळ्या जागांचे संवर्धन अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच निर्णय आता आपल्या हातात आहे आणि त्याच्या परिणामाची झलक काल पुणेकरांनी प्रत्यक्ष अनुभवली असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




