
‘स्पिरिट ऑफ पिंकॅथॉन’च्या सहाव्या पर्वांतर्गत महिलांनी मुंबई ते पुणे अशी १६० किलोमीटरची धाव यशस्वीपणे पूर्ण केली. मुंबईतील शिवाजी पार्क येथून सुरू झालेली ही आव्हानात्मक धाव तीन दिवसांत पुण्यातील एएफएमसी ग्राउंड येथे संपली. या उपक्रमातून महिलांच्या शारीरिक सुदृढता, मानसिक ताकद आणि सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. या धावेचे नेतृत्व ४९ वर्षीय अल्ट्रा-मॅराथॉनर कॅप्टन पूजा मेहरा (निवृत्त) आणि ४५ वर्षीय एन्ड्युरन्स रनर पूनम करंजकर यांनी केले. त्यांच्या चिकाटी, शिस्त आणि जिद्दीमुळे ही कठीण धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली. महिलांना स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यास आणि आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रेरित करणे, हेच ‘पिंकॅथॉन’चे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘पिंकॅथॉन’चे संस्थापक मिलिंद सोमण यांनी याविषयी बोलताना सांगितले की, शारीरिक सुदृढता केवळ शरीरापुरती मर्यादित नसून ती मन आणि भावनांशीही संबंधित आहे. महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवून त्यांच्या क्षमतेची नवी व्याख्या निर्माण करावी, असा संदेश या धावेतून दिला जातो. कॅप्टन पूजा मेहरा आणि पूनम करंजकर यांची जिद्द इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. इन्व्हिन्सिबल विमेनच्या संस्थापिका अंकिता कोनवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, अशा सहनशक्तीच्या यात्रा केवळ अंतर पूर्ण करण्यापुरत्या नसून त्या शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. महिलांना भीतीवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा अशा उपक्रमांतून मिळते, असेही त्यांनी सांगितले. कॅप्टन पूजा मेहरा यांनी ही धाव स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा आणि क्षमतेवर नव्याने विश्वास ठेवण्याचा प्रवास असल्याचे म्हटले. पूनम करंजकर यांनी हा अनुभव त्यांच्या धावण्याच्या दशकपूर्तीशी जोडलेला एक खास क्षण असल्याचे नमूद केले. गेल्या काही वर्षांपासून ‘पिंकॅथॉन’ ही केवळ एक धाव नसून ती एक देशव्यापी चळवळ बनली आहे. महिलांच्या आरोग्य, आत्मविश्वास आणि सशक्तीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रत्येक स्त्री स्वतःची नायिका बनू शकते, हा संदेश यातून अधिक ठामपणे पोहोचवला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




