
नक्षलवादाच्या प्रश्नावर केंद्र सरकार श्रेय घेत असल्याबाबत काँग्रेसने तीव्र टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांना “बालिश, अहंकारी आणि हास्यास्पद” असे संबोधले आहे. माओवादी-नक्षलवादाच्या खात्म्याचे श्रेय केवळ विद्यमान सरकारला देणे चुकीचे असून, पूर्वीच्या काँग्रेस-प्रणीत सरकारांचे योगदान अधिक असल्याचा दावा त्यांनी केला. गोपाळ तिवारी म्हणाले की, नक्षलवादाविरोधातील लढा हा अनेक दशकांपासून सुरू आहे. काँग्रेसच्या काळातही अनेक नेत्यांनी जीवाची आहुती दिली. नंदकुमार पटेल, विद्याचरण शुक्ला आणि महेंद्र कर्मा यांसारख्या नेत्यांचा नक्षलवादी हल्ल्यांत मृत्यू झाला, याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच झिरम घाटी हत्याकांड प्रकरणात दोषींना शिक्षा देण्यात अपयश आल्याचाही आरोप त्यांनी केला. तिवारींनी दिला आकडेवारीचा दाखला गृह मंत्रालयाच्या आकडेवारीचा दाखला देत तिवारी म्हणाले की, २००४ ते २०१३ या कालावधीत २१६० नक्षलवादी ठार झाले, तर २०१४ ते २०२५ दरम्यान २०८८ नक्षलवादी मारले गेले. यावरून पूर्वीच्या सरकारांनीही प्रभावी कारवाया केल्या असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे विद्यमान सरकारने केवळ श्रेय घेण्याऐवजी सातत्याने चालत आलेल्या धोरणांची कबुली द्यावी, असे त्यांनी म्हटले. नक्षलवाद कमी होण्यामागे केवळ लष्करी कारवाया नव्हे, तर सामाजिक व विकासात्मक उपाय महत्त्वाचे ठरले. यूपीए सरकारने आदिवासी भागात रस्ते, शाळा, आरोग्य सेवा, वीज व मोबाईल नेटवर्क यांचा विस्तार केला. तसेच फॉरेस्ट राइट्स ॲक्ट २००६ आणि जमीन अधिग्रहण कायदा २०१३ यांसारख्या कायद्यांद्वारे आदिवासींचे हक्क मजबूत करण्यात आले. या उपायांमुळे नक्षलवादाबद्दलची सहानुभूती कमी झाली, असा दावा तिवारी यांनी केला. याउलट, विद्यमान सरकारवर त्यांनी आदिवासींचे हक्क कमकुवत करून संसाधने कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळवण्याचा आरोप केला. छत्तीसगड, ओडिशा व इतर राज्यांतील खाण प्रकल्पांमुळे स्थानिकांचा विरोध वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. “विकास हा कोणासाठी आणि कोणत्या किमतीवर” हा प्रश्न उपस्थित करत, आदिवासींच्या संमतीशिवाय होणारा विकास हा अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नक्षलवाद पूर्णतः संपल्याचा दावा अतिशयोक्तीपूर्ण असून अजूनही अनेक जिल्हे प्रभावित आहेत, असेही त्यांनी सांगितले. अर्बन नक्षलवाद देखील २०१४ पूर्वी कुठे दिसून येत नव्हते, मात्र भाजपच्या काळात अर्बन नक्षलवाद वाढल्याचे दिसून येते हे अपयश भाजपचेच आहे. आदिवासी सक्षमीकरण आणि समावेशक विकासाशिवाय नक्षलवादाचा कायमस्वरूपी अंत शक्य नाही, असा इशाराही काँग्रेसने दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




