
“पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषद ही केंद्र आणि राज्यांमधील समन्वय अधिक मजबूत करत शेती क्षेत्रासाठी ठोस दिशा देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या माध्यमातून घेतलेले निर्णय थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीस चालना देतील,” असे मत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. ते आज जयपूर येथे आयोजित पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेत बोलत होते. देशातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्षेत्रीय परिषदांच्या मालिकेची सुरुवात आज जयपूर येथे पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेद्वारे झाली. या परिषदेत महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा राज्यांचे कृषी मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकार व कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेले महाविस्तार अँप, अॅग्रिस्टॅक व एआय धोरण यांचे या परिषदेत अनेकांनी कौतुक केले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत केंद्र-राज्य समन्वय बळकट करणे, विविध कृषी योजनांचा आढावा घेणे तसेच आगामी खरीप हंगाम 2026 साठी धोरण निश्चित करणे यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेताना अॅग्रिस्टॅक अंतर्गत 1.32 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि निर्यात क्षेत्रातील आघाडीचा उल्लेख केला. मात्र, 2025-26 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहितीही देण्यात आली. सुमारे 136 लाख शेतकरी आणि 105 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून राज्य सरकारने 20,196 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार त्यानी व्यक्त केले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या सुरुवातीला देखील अवकाळी पावसाचा फटका बसत 29 जिल्ह्यांतील 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. सध्या प्रशासनाकडून पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारकडेही अतिरिक्त मदतीची मागणी करण्यात आली आहे,असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खरीप 2026 साठी राज्याने 158.92 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले असून बियाणे व खतांचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बीबीएफ तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि आधुनिक शेती पद्धतींचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,“केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे खरीप हंगाम 2026 यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना सक्षम करण्याचे काम सातत्याने सुरू राहील.” तसेच त्यांनी पुढे असेही नमूद केले,“अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवरही महाराष्ट्रातील शेतकरी खंबीरपणे उभा आहे. शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असून, तातडीने मदत आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे शेती अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे.” या परिषदेमुळे आगामी काळातील कृषी धोरणांना दिशा मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह जी चौहान साहेब, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलालजी शर्मा साहेब, केंद्रिय कृषी राज्यमंत्री श्री.भगीरथजी चौधरी साहेब, राजस्थानचे कृषी मंत्री श्री.डॉ.किरोड़ी लाल मीना जी, गुजरातचे कृषी मंत्री श्री.जितुभाई सवजीभाई वाघानी जी, मध्य प्रदेशचे कृषी मंत्री श्री.ऐदल सिंह कंसाना जी, गोव्याचे समाज कल्याण मंत्री श्री.सुभाष उत्तम पाल देसाई जी, कृषी विभागाचे केंद्रिय प्रधान सचिव श्री.अतिश चंद्रा यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.





