
Maharashtra
-Pritesh Suryawanshi
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने आज संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी या निवडणुकीत केवळ विजयच मिळवला नाही, तर मताधिक्याचा एक अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे. २४ व्या फेरीअखेर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने विजय संपादित केला असून, हा आजवरचा देशातील कोणत्याही विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक मताधिक्याचा आकडा ठरला आहे.
यापूर्वी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातून सुनील कुमार शर्मा यांनी २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजय मिळवला होता, तो विक्रम आता सुनेत्रा पवारांनी मोडीत काढला आहे.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभे असलेल्या इतर कोणत्याही उमेदवाराला साधी हजाराची मतसंख्याही ओलांडता आली नाही. प्रसिद्ध उमेदवार करुणा मुंडे यांना अवघ्या १२५ मतांवर समाधान मानावे लागले, तर अभिजित बिचुकले यांना केवळ १२१ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह जय पवार आणि पार्थ पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सर्वपक्षीय पाठिंबा आणि संघटनांच्या मदतीने बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांच्या पारड्यात भरभरून दान टाकले आहे.
विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना पार्थ पवार काहीसे भावूक दिसले. त्यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले खरे, मात्र ही निवडणूक ज्या परिस्थितीत झाली त्याबद्दल दुःखही व्यक्त केले. आजचा दिवस आनंदाचा असला तरी कार्यकर्त्यांनी कोणताही जल्लोष किंवा मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, आचारसंहिता संपल्यानंतर आपण स्वतः जनतेच्या प्रश्नांसाठी ‘जनता दरबार’ घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना हा विजय आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित केला आहे. त्यांनी म्हटले की, बारामतीकरांनी जो विश्वास दाखवला आहे, ती एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. हा विजय म्हणजे दादांच्या स्वप्नातील ‘नव्या बारामती’च्या उभारणीचा निर्धार असून, कार्यकर्त्यांनी संयम राखून दादांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा. विजयाचा गुलाल न उधळता शांततेत हा निकाल स्वीकारण्याची विनंती करत त्यांनी ही लढाई संघर्षाची आणि विकासाची असल्याचे अधोरेखित केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.







