
ST AC Shivshahi Service: राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशावर गेला आहे. मागील काही आठवड्यांपासून सातत्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहेत. एकीकडे उन्हाळ्याची दाहकता अधिक वाढलेली असतानाच दुसरीकडे याचा राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला फायदा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एसटीकडून उन्हाळ्यानिमित्त मुंबईतून रोज शिवशाहीच्या 25 एसी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात या एसी शिवशाही गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रवासात काहीवेळा एसी बंद असणे, अस्वच्छ सीट अशा तक्रारी असल्या, तरी त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
कोणत्या मार्गावर धावतात बस
सध्याच्या घडीला मुंबईहून सातारा, गुहागर, शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि कराड या मार्गावर शिवशाही एसी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. एसटी प्रशासनाच्या माहितीनुसार, वाढत्या उन्हामुळे या एसी बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अधिकाधिक प्रवाशांना वेळेत, सुरक्षित आणि आरामदायी सेवा देता यावी, यासाठी एसटीचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
गाड्यांमधील एसी बंद पडण्याच्या वाढत्या तक्रारी
एका बाजूला या एसी बसला उत्तम प्रतिसाद मिळत असताना दुसऱ्या बाजूला प्रवाशांनी ‘जास्त भाडं देऊनही बसचा एसीच बंद पडत असेल, तर प्रवास आरामदायक कसा होईल,’ अशी नाराजी व्यक्त केली आहे. एसटी प्रशासनाने मात्र एसी बंद असल्यास नजीकच्या आगारातून या गाड्यांमध्ये तत्काळ एसी बस उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
एसटीमध्ये बिघाडही वाढला
> शिवशाहीच्या बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक बस रस्त्यातच बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत.
> अशा वेळी प्रवाशांना तासन् तास वाट पाहावी लागते. तांत्रिक बिघाडामुळे काही फेऱ्या वेळेवर होत नाहीत आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होते. याबाबत नाराजी असली तरी गाड्यांना प्रतिसाद कमी झालेला नाही.
> शिवशाही सेवा चांगली आहे. परंतु काही वेळेस सीट्स खूप अस्वच्छ असतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.