
Narhari Jhirwal on resignation after ACB Raid: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला असून, कार्यालय सील करण्यात आलं आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगेला 35 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे. परवाना निलंबन रद्द करण्यासाठी त्याने 50 हजारांची मागणी केली होती. या घटनेनंतर नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली असून, राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य केलं आहे.
नरहरी झिरवाळ दिल्लीत असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जर या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध आढळला तर राजीनामा देणार असं जाहीर केलं आहे. तसंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचे दावे फेटाळून लावले. आपण मुंबईत गेल्यावर बैठक घेणार असून, इतर कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“मी तर परवापासून येथे आहे. हा प्रकार चुकी़चा असून, असं व्हायला नको होतं. ढेरंगे हे आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात. सुनावणीते पेपर बनवण्याचं काम ते करतात. तसे ते मूळचे अन्न, नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसणवारीवर घेतललं होतं. आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. त्याला जाब द्यावा लागणार आहे,” असं नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं आहे.
“या सगळ्याचा खातं, मंत्री, मंत्र्यांचे पीए याच्याशी काही संबंध नाही. जे घडत आहे, ती नक्कीच आमची जबाबदारी आहे. पण आम्ही पाठीशी घालणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या नियुक्तीसंदर्भात गृहखात्यात तपासूनच येतं. पण त्यांचा पूर्वीचा काही रेकॉर्ड असेल तर माहिती नाही. त्यांची कधीच तक्रार आली नव्हती असंही ते म्हणाले.
राजीनामा देणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, “जर माझ्यापर्यंत येणार असेल तर मी राजीनामा देणार. जर खरंच माझ्याशी लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन. ज्याने केलं त्याला लगेच शिक्षा भोगावी लागते. माझ्यापर्यंत जबाबदारी आली तर नक्कीच विचार करेन. यासंदर्भात पक्ष नेतृत्वाशी चर्चा झालेली नाही. मी त्यांच्याशी बोलणार आहे. कोणाच्याही विभागात घडलं तरी ते चुकीचं आहे”.
यावेळी त्यांनी टार्गेट केलं जात असल्याचे दावे फेटाळले. मला कोणी टार्गेट करणार नाही. माझा स्वभाव सर्वांना माहिती आहे. मी कधीच काही चुकीचं करणार नाही असं ते म्हणाले. त्यांच्यात आणि माझ्यात फार काही बोलण्याचा संबंध नाही. 7-8 दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. अंदाज असता तर तेव्हाच कारवाई केली असती असंही ते म्हणाले.
नेमकं काय झालं?
मुंबईत मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगेला 35 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे. झालं असं की, लातूरमधील एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. रद्द परवाना नूतनीकरण करण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या मंत्र्यांना असतात. त्यासंदर्भात सुनावणी घेऊन निर्णय घेतले जातात.
मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक आलोसो राजेंद्र ढेरंग याने एका नागरिकाकडे लाच मागितली होती. त्याने 50 हजारांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.
पडताळणीत ढेरंगेने लाच मागितल्याचं स्पष्ट झालं. यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आला. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता तडजोडीअंती ढेरंगे तक्रारदाराकडून 35 हजार रुपये घेण्यास तयार झाला. अखेर, 35 हजाराची लाच घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढेरंग याच्यासह कार्यालयातील आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. आपण झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यानुसार घेतली असा दावा त्याने केला आहे. खासगी सचिव हे मंत्री कार्यालयाचे प्रमुख असतात. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



