
Pandharpur Ashadi Ekadashi 2025 Special ST Buses Trains Details: सालाबादप्रमाणे यंदाही राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीने आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांसाठी विशेष गाड्यांची सोय केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने 5200 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यंदा मध्य रेल्वेकडूनही आषाढी एकादशी आणि वारीच्या पार्श्वभूमीवर विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहेत.
तिकीटदरात विशेष सवलत कायम
एसटी महामंडळाने आषाढीनिमित्त विशेष सवलतीच्या दरांमध्येच भाविकांना पंढरपूर दर्शन घडवणार असल्याचं सांगितलं आहे. पंढरपूरसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांच्या प्रवासातदेखील 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सूट देणारी ‘महिला सन्मान योजना’ यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. गतवर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त पाच हजार विशेष बसेस सोडल्या होत्या. 21 लाख प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला होता.
…तर थेट गावातून पंढरपूरसाठी सोडणार एसटी
विशेष म्हणजे एसटी महामंडळाकडून थेट गावातून पंढरपूरला एसटी सोडण्याचीही विशेष योजना अंमलात आणली जाणार आहे. एकाच गावातील गावकऱ्यांनी एसटीच्या विशेष बससाठी ग्रुप बुकिंग केल्यास गावातून थेट पंढरपूर अशी सेवाही दिली जाणार आहे. राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांना आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा लागणार आहे.
पंढरपूरमध्ये चार तात्पुरती स्थानकं
यात्राकाळात पंढरपूर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती स्थानके उभारण्याचा निर्णयही एसटी महामंडळाने घेतला आहे.
मध्य रेल्वे 80 आषाढी विशेष ट्रेन चालवणार
पंढरपुरातील आषाढी वारीला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे 1 जुलै ते 10 जुलै या कालावधीत पंढरपूर व मिरजसाठी 80 आषाढी विशेष ट्रेनच्या सेवा चालवणार आहे. नागपूर-मिरज विशेष गाड्या (4 सेवा), नवीन अमरावती-पंढरपूर विशेष (4 सेवा), खामगाव-पंढरपूर विशेष (4 सेवा), भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष (2 सेवा), लातूर-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या (10 सेवा) चालवण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर मिरज-कलबुर्गी अनारक्षित विशेष गाड्या (20 सेवा), कोल्हापूर-कुडुवाडी अनारक्षित विशेष गाड्या (20 सेवा), पुणे-मिरज अनारक्षित विशेष गाड्या (16 सेवा) चालवण्यात येणार आहेत. या आषाढी विशेष ट्रेनचे आरक्षण विशेष शुल्कासह 16 जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.