
Beed Crime: बीडच्या साक्षी कांबळेच्या आत्महत्येला आता नवा वळण लागला आहे. पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगाला अश्रू दिसतात, पण बीडच्या साक्षीच्या आईचे अश्रू मात्र दिसत नाहीत…? असा जळजळीत सवाल खुद्द साक्षीच्या आईने मुंबईत भर महिला संवाद बैठकीत उपस्थित केला आहे. साक्षी कांबळेची आई कोयना लेकीचा फोटो हातात धरून काळीज पिळवटून अश्रू ढाळत होती. साक्षी या जगात नाहीये यावर तिचा थोडा देखील विश्वास नाही. एक मध्यमवर्गीय घरातील, लग्न ठरलेली मुलगी. पण छेडछाडीला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं. आणि गळफास लावून आत्महत्या केली. आज तिच्या आईच्या वेदना मुंबईतील महिला आयोगाच्या बैठकीत अश्रूंसह बाहेर पडल्या. तिथे केवळ वैष्णवी बद्दलच होत असलेली चर्चा पाहून कोयना यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
‘आम्ही कुठे जायचं न्याय मागायला…?’
या बैठकीत पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणावर मोठी चर्चा झाली. मात्र साक्षी कांबळेच्या प्रकरणाकडे मात्र दुर्लक्ष झालं. यावरच साक्षीची आई – कोयना विटकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ‘तुम्हाला वैष्णवीच्या आईचे अश्रू दिसतात, मग माझ्या मुलीचे काय…? लग्न ठरलेली माझी मुलगी फासावर लटकलेली पाहिली. काळीज फाटलं माझं! आम्ही मध्यमवर्गीय, आम्ही कुठे जायचं न्याय मागायला…?’, असा संतप्त सवाल साक्षीच्या आईने केलाय.
‘केवळ प्रतिष्ठा असेल तरच न्याय मिळतो का?’
या घटनेनंतर मुंबईहून उपसभापती नीलम गोऱ्हे बीडमध्ये आल्या. त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. मात्र बीडचे प्रतिनिधी – मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे आणि आमदार नमिता मुंदडा – यांनी अजूनही साधी चौकशीदेखील केली नाही, असा थेट आरोप साक्षीच्या आईने केला आहे.एकीकडे प्रतिष्ठित कुटुंबातील प्रकरणांना मोठ्या न्यायसंस्था, आयोग तातडीनं प्रतिसाद देतात, तर दुसरीकडे मध्यमवर्गीय साक्षीसारख्या मुलींना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याच आईला संघर्ष करावा लागतोय. हे फक्त सामाजिक नाही, तर मानसिकतेचंही चित्र आहे. साक्षीच्या आईचा हा जळजळीत सवाल आहे – ‘केवळ प्रतिष्ठा असेल तरच न्याय मिळतो का?’ राज्याच्या जबाबदार प्रतिनिधींनी देखील आता याचं उत्तर द्यायला हवं…!
छेडछाडीला कंटाळून साक्षीने घेतला गळफास
साक्षी कांबळे बीड शहरातील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयात शिक्षण घेत होती.कला विभागाच्या तिसऱ्या सत्रात शिकत होती. याच महाविद्यालयातील अभिषेक कदम या मुलाने तिची छेड काढली. ब्लॅकमेल आणि वारंवार होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून साक्षीने गळफास घेवून आत्महत्या केली. 14 मार्च रोजी मामाच्या गावी धाराशिव येथे असताना आत्महत्या केली. त्यानंतर धाराशिव पोलिसात चार दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. आरोपी 20 दिवसानंतर स्वतःहून जंगी डामडौल करत पोलिसांना शरण गेला.
85 दिवस उलटले तरी न्याय नाही
या प्रकरणात दुसरी आरोपी शितल कदम ही महिला कर्मचारी आहे. घटनेला 85 दिवस होत आले आहेत. या प्रकरणात धाराशिव येथील पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्याकडे तपास होता. त्यांच्या निष्क्रियतेचा ठपका पडल्याने तपास काढून घेण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास धाराशिव येथील आयपीएस महिला पोलिस अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.