
Cough Syrup Deaths Pune Prob: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित खोकल्याच्या औषधामुळे म्हणजेच कफ सिरपमुळे आतापर्यंत 17 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर राज्यातील औषध प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. पुणे विभागात विक्री होणाऱ्या कफ सिरपची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केली असून, संबंधित कंपनीच्या सिरपची विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश औषध विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.
पुण्यात त्या औषधाचा साठा?
दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत 17 मुलांचा मृत्यू झाल्याची नोंद असून, या मृत्यूंमागे दूषित कफ सिरप कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर एफडीएने पुण्यात या कंपनीचा औषधसाठा उपलब्ध आहे का, याची तपासणी हाती घेतली आहे. संबंधित कंपनीच्या सिरपचा साठा आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश निरीक्षकांना देण्यात आले असल्याची माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारचं म्हणणं काय?
दरम्यान, या घटनेनंतर केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. या वयोगटातील मुलांच्या शरीरात औषधांतील रासायनिक घटकांचे विघटन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे त्याचे विषारी दुष्परिणाम होऊ शकतात. पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठीही ही औषधे पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे डीजीएचएसने म्हटले आहे. एफडीएने तपासणी सुरू ठेवली असून, संबंधित कंपनीचे कफ सिरप पुण्यात सापडल्यास तातडीने जप्ती व नमूना चाचणी केली जाईल.
पुणे केमिस्ट असोसिएशनचं म्हणणं काय?
पुणे जिल्ह्यात सुमारे 22 हजार केमिस्ट कार्यरत आहेत. आमच्या सदस्यांकडून नियमानुसारच औषधांची विक्री केली जाते. संबंधित कंपनीचा साठा सध्या शहरातील कोणत्याही उत्पादक किंवा विक्रेत्याकडे उपलब्ध नाही, अशी माहिती पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर यांनी दिली आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये घडलं काय?
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एकंदर 14 मुलांचा या विषारी कफ सिरपमुळे मृत्यू झाला, तर राजस्थानात भरतपूर व सिकर येथे तीन मुलांचा सरकारी दवाखान्यातून देण्यात आलेल्या खोकल्याच्या औषधाने बळी घेतला. शासकीय आरोग्य केंद्रांवर मोफत दिले जाणारे हे औषध घेतल्यामुळे अजूनही अनेक लहान मुले वेगवेगळय़ा रुग्णालयांत दाखल आहेत. यापैकी काही मुले व्हेंटिलेटरवर आहेत. निकृष्ट व भेसळयुक्त औषधामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुले दगावल्यानंतर आता कुठे सरकारी यंत्रणेची झोप उडाली आहे. वापरलेली औषधे प्रयोगशाळेत पाठवून त्यांची तपासणी करणे, सरकारी रुग्णालयांना पाठवलेला औषधांचा साठा परत मागवून तो नष्ट करणे अशा उपाययोजना आता सरकारने सुरू केल्या आहेत.
औषधांमध्ये आहे काय?
कोल्ड्रीफ आणि नेक्सा डीएस या दोन खोकल्याच्या औषधांवर आता बंदी घालण्यात आली आहे. ज्या कोल्ड्रीफ नावाच्या औषधाने सर्वाधिक बळी घेतले, ते औषध तामीळनाडूमधील श्रीसन फार्मास्युटीकल नावाची कंपनी बनवते. देशभरातील अनेक राज्यांना या औषधाचा पुरवठा होतो. या औषधात डायथिलीन ग्लायकॉल या वाहन उद्योगांत वापरल्या जाणाऱ्या घातक व विषारी रसायनाची भरमसाट भेसळ करण्यात आली होती. या रसायनाचे प्रमाण औषधात केवळ 0.1 टक्का इतकेच अपेक्षित असताना तब्बल 46 ते 48 टक्के इतके प्रमाण या औषधाच्या तपासणीत आढळून आले. औषधाचा दर्जा राखण्याऐवजी कारच्या कुलंट व ब्रेकमध्ये वापरली जाणारी स्वस्तातील घातक रसायने या औषधात मोठय़ा प्रमाणात मिसळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.