
Big responsibility on Dhananjay Munde: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीमुळे सत्ताकेंद्र कुणाकडे जाणार, कोणती महत्त्वाची खाती कुणाला मिळणार, यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांकडे असलेली प्रभावी पदे आणि महत्त्वाची खाती पुढे कोण सांभाळणार, यावर चर्चा सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. काही काळापासून राजकीय पडद्याआड गेलेले माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बंद दाराआड चर्चेनंतर अवघ्या 24 तासांत मुंडेंच्या पुनरागमनाच्या चर्चेला जोर आला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री?
दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास संमती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासूत्रे पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत. पक्षात फूट पडू नये आणि संघटना एकसंध राहावी यासाठी नेतृत्व पवार कुटुंबातच असावे, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पक्षप्रमुखपदासाठीही सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे.
अर्थ खाते कोणाकडे जाणार?
अजित पवारांकडे असलेली अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती कोणाकडे सोपवायची, यावर सध्या राजकीय पातळीवर मोठी रस्सीखेच सुरू आहे. विशेषतः अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावं, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात झालेल्या बंद दाराआड चर्चेने राजकीय चर्चांना अधिक उधाण आणले आहे.
धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात पुनरागमनाची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, पुढे मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे याना पुन्हा संधी देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरताना मुंडेंच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात असल्याची चर्चा आहे.
मुंडेंचा राजीनामा कशामुळे झाला होता?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली होती. राजकीय दबाव वाढल्यानंतरत्यांनी राजीनामा दिलाही परंतु प्रकृतीचे कारण पुढे करत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता मात्र राजकीय परिस्थिती बदलताना दिसत असून, त्यांच्या पुनरागमनाची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली होती.
पार्थ पवारांनाही संधी?
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, यावरही चर्चा रंगली आहे. या जागेसाठी पार्थ पवार यांचे नाव पुढे येत असून, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबाभोवती पुन्हा एकदा सत्ताकेंद्र तयार होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



