
Nitesh Rane vs Nilesh Rane: मालवणमध्ये निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकली. निलेश राणे यांनी याचा लाईव्ह व्हिडिओ तयार करत हे स्टिंग ऑपरेशन केलं. ते पोलिसांनाही सोबत घेऊन आले होते. अशी 5 ते 6 घरं असल्याचा दावाही त्यांनी केला आहे, ज्यामधून मतदारांना पैशांचं वाटप केलं जात आहे. यानंतर आज नितेश राणे यांनी आज संबंधित भाजपा कार्यकर्त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना भाऊ निलेश राणेंना उत्तर दिलं.
“आम्ही राजकीय पक्षाचे सदस्य आहोत, पण आमचं वैयक्तिक आयुष्य आहे. आमचे व्यवसाय आहेत. आम्ही समाजकारण करून राजकारण करतो. विजय केनवडेकर अनेक वर्षापासून व्यवसाय करत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या घरात उलाढाल आहे. मग काय चुकीच आहे?,” अशी विचारणा त्यांनी केला आहे.
“भाजपाला अशा पद्धतीने निवडणुका लढविण्याची काही गरज नाही. आमच्याकडे मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे. फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत. आम्हाला अशा पद्धतीने निवडणूक लढवण्याची गरज नाही. आम्ही विकासावर, आमच्या सरकारच्या योजनांवर निवडणुका लढवत आहोत. सगळ्या प्रकारावर राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस चौकशी करतील. ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांच्या व्यवसाय आणि पार्श्वभूमी आपण बघणार आहोत की नाही? सगळी चौकशी निःपक्षपाती होईल,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
पुढे ते म्हणाले, “आता सगळ्या तक्रारींवर चौकशी होईल. हमाम मे सब नंगे होते है. विचारपूर्वक सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. प्रत्येक घरात मोदी साहेबांच्या योजनेचे लाभार्थी आहेत, त्यामुळे पैसे वाटण्याची गरज नाही. कोणी किती प्रयत्न केले तरी निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर होतील. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार. चौकशी होईल तेव्हा निवडणूक आयोग याचं उत्तर देईल”.
“चव्हाण साहेबांवरील आरोप हा राजकीय आहे. उदय सामंत पण येऊन गेले, ते सहज आलेले की सॅन्टाक्लॉज बनून आलेले असं आम्ही विचारू का? चव्हाण साहेबांनी कोकणात भाजपा रुजवली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून विजय मिळविला तेव्हा चव्हाण साहेब होते ना? आम्ही आमची आमची निवडणूक लढवत आहोत. मैत्रीपूर्ण लढत आहोत. आम्ही मालवण शहराच्या विकासावर बोलतोय आमची भाषण बघा फक्त विकासच दिसेल. भाजपाचे राणे साहेब नेते आहेत . आमच्या उमेदवारांना राणे साहेबांनी आशीर्वाद दिला आहे. तुमचे चॅनल चालाव म्हणून आमचा खटाटोप आहे,” असंही त्यांनी म्हटलं.
निलेश राणे यांच्या आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जास्त बोलणं टाळलं. 2 डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे. त्यामुळे मी आता काही बोलणार नाही. निलेश राणेंचे आरोप चुकीचे आहेत असं ते म्हणाले आहेत.
निलेश राणेंनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट
“मी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. काल जी मी तक्रार दिली होती त्या तक्रारीचे काय झाले? याची माहिती घेण्यासाठी मी आलो होतो. याप्रकरणी पैसे जप्त झाले आहेत. मात्र, ती अंतिम रक्कम नाही हेच मी त्यांना आता परत सांगितलं. जर अंतिम रक्कम नसेल तर बाकीच्या रकमेवर तुमचे लक्ष आहे का? आणि याची एफआयआर होणार आहे का? कारण हा गुन्हा झालेला आहे आणि गुन्ह्याचा पहिला भाग असल्याने एफआयआर होणे महत्त्वाचे आहे,” असं निलेश राणे म्हणाले आहेत.
“याप्रकरणी कलमं लावावी लागतात. पण हेच जर केलं नसेल या घटनेला काहीही अर्थ राहणार नाही. लोकांची पुन्हा हिंमत होईल की जे पैसे मालवणमधून बाहेर गेलेत ते मालवणमध्ये आणतील. जर गुन्हा दाखल झाला नाही मग कालचा प्रकार काय होता? याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या समितीला दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी त्या समितीशी बोलून माझ्याशी बोलतील,” अशी माहिती त्यांनी दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



