
Ladki Bahin: लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होऊ लागलाय. मात्र हा हप्ता 1500 वरुन 2100 रुपये कधी होणार याकडे महिला डोळे लावून बसलेत. मात्र अशावेळी मंत्री शिरसाटांनी केलेल्या एका वक्तव्यानं या लाडक्या बहिणींच्या आशा मावळ्यात.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांसह महायुतीसाठी डोकेदुखी ठरु लागल्याचं दिसतंय.. त्यात आपल्या खात्यातील निधी आपल्याशी कोणतीही चर्चा न करता लाडक्या बहिणींसाठी वळवण्यावरुन नाराज झालेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आता नवीन विधान केलंय. महायुतीनं निवडणुकीवेळी आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणं लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणं अशक्य असल्याचं शिरसाट म्हणालेत. ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल आणि याचा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर पडत असल्याची कबुलीच शिरसाट यांनी दिलीय.
विरोधकांकडून टीका
शिवसेना नेते आणि मंत्री शिरसाटांच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. महायुतीला निवडून देणाऱ्या महिलाही आता सरकारला खोटारडं म्हणायला लागल्यात अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलीय.इतकंच नाही तर महापालिका निवडणुका झाल्यावर ही लाडकी बहीण योजना बंद पडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केलीय. शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर निशाणा साधलाय. मागासवर्गीयांचा निधी पळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली का असा सवालच विजय वडेट्टीवार यांनी केला. विरोधकांच्या या चौफेर टीकेनंतर भाजपने सारवासारव केलीय. निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करू अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय.
1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळणार ?
बावनकुळे जरी संकल्पपूर्तीचं आश्वासन देत असले तरी लाडकी बहीण योजनेचा मोती सध्या महायुतीच्या नाकाला जड होऊ लागलाय हे उघड सत्य आहे. त्याबद्दलची नाराजी आता मित्रपक्षच आणि खासकरुन शिवसेना शिंदे गट बोलून दाखवू लागलाय. तेव्हा लाडक्या बहिणींवरुन महायुतीतल्या मित्रांमधला वादही वाढत चाललाय. या सगळ्यात खरंच लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळणार याचं उत्तर मात्र सध्या कुणाकडेच नाही.
लाडक्या बहिणी खूष- झिरवळ
लाडक्या बहिणी नाराज असल्याचे आपण किंवा विरोधक सांगतात. पण सर्व लाडक्या बहिणीला खुश आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही, असं विधान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलंय. हे पंधराशे रुपयेदेखील देणार नाहीत यांची देण्याची ऐपत नाही असा प्रचार विरोधकांनी सुरू केला होता. मात्र 1500 रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयावर जास्त जोर धरला आहे. मला वाटतं पंधराशे रुपये ही रक्कमदेखील परिपूर्ण आहे. महिला पंधराशे रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत, असे झिरवळ म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.