digital products downloads

Maharashtra Mayor List 2026: तुमच्या शहराचा महापौर कोण? एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Mayor List 2026: तुमच्या शहराचा महापौर कोण? एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Municipal Mayor List 202 : राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होऊन बराच काळ झाला आहे. आता सगळीकडे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीी लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातील जवळपास आठ ते दहा महापालिकांच्या महापौर पदाची कुणाची नावे जाहीर झाली आहेत हे यामध्ये पाहणार आहोत. भाजपने यामध्ये आपले स्थान बळकट केले आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पुणे महापौर (Pune Mayor 2026): भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची पुणे महापौरपदी निवड

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) प्रतिष्ठेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने अनुभवी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आज पक्षाकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. पुणे महापौरपदासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच पाहायला मिळाली. या शर्यतीत वर्षा तापकीर, मानसी देशपांडे आणि मंजुषा नागपुरे यांची नावे चर्चेत होती. पक्षाच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेतृत्वामध्ये झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुषा नागपुरे यांच्या नावाचा अंतिम निर्णय घेतला.

ठाणे महापौर(Thane Mayor 2026): शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर; ‘या’ कारणामुळे अजूनही खुर्ची रिक्त

ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाली आहे. त्यांनी निवडणुकीची सर्व औपचारिकता पूर्ण करून महापौर पदाचा कार्यभार (चार्ज) स्वीकारला असला, तरी त्या अद्याप अधिकृत खुर्चीवर विराजमान झालेल्या नाहीत. महापौर निवडीनंतर तातडीने कामकाज सुरू होणे अपेक्षित असताना, एक विशेष कारण समोर आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या दौऱ्यात व्यस्त आहेत. शिंदे हे ठाण्याचे सुपुत्र आणि पक्षाचे मुख्य नेते असल्याने, त्यांच्या उपस्थितीतच महापौर दालनातील मुख्य खुर्चीवर बसण्याचा निर्णय शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला आहे.

कल्याण-डोंबिवली महापौर(Kalyan Dombivli Mayor 2026): महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थविल, तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांची बिनविरोध निवड

कल्याण: गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला (KDMC) नवे नेतृत्व मिळाले आहे. महापौरपदी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नगरसेविका हर्षाली चौधरी थविल यांची, तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे राहुल दामले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीत महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विरोधी पक्षांकडून कोणताही उमेदवार रिंगणात नसल्याने हर्षाली थविल आणि राहुल दामले यांची निवड बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा करताच पालिका मुख्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

जळगाव महापौर(JalgaonMayor 2026): महायुतीचा गुलाल! महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी

जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या राजकारणात महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे (शिंदे गट) मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
सोमवारी जिल्ह्याचे दोन्ही ताकदवर नेते, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या दोन्ही नावांची अधिकृत घोषणा केली. महायुतीमधील समन्वय आणि नेत्यांच्या निर्णयामुळे ही निवड प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली असून, विरोधकांनी माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे.

अहिल्यानगर महापौर(Ahilyanagar Mayor 2026): महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे, तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव; पालकमंत्री विखेंकडून घोषणा

अहिल्यानगर: शहराचे नामकरण झाल्यानंतरच्या पहिल्या महापौर निवडीत महायुतीने बाजी मारली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती गाडे आणि उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे धनंजय जाधव यांची निवड निश्चित झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. स्थानिक राजकारणातील सर्व समीकरणे जुळवून आणत विखे पाटील यांनी ही निवड प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण केली. 

मीरा-भाईंदर महापौर(Mira Bhayandar Mayor 2026): विरोधाची धार डावलून भाजपकडून डिंपल मेहता यांची महापौरपदी वर्णी

मीरा-भाईंदर: राजकीय वाद आणि स्थानिक संघटनांचा विरोध झुगारून मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या डिंपल मेहता यांची निवड करण्यात आली आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या त्या वहिनी असून, भाजपने त्यांच्या अनुभवावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. या निवडीपूर्वी ‘मराठी एकीकरण समिती’ने आक्रमक पवित्रा घेत शहरात मराठी महापौरच झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती. समितीने यासंदर्भात भाजपला स्पष्ट इशाराही दिला होता. मात्र, स्थानिक राजकीय समीकरणे आणि पक्षीय बलाबल लक्षात घेता, भाजपने डिंपल मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

वसई-विरार महापौर(Vasai Virar Mayor 2026): बालेकिल्ल्यात ‘बविआ’चा डंका! अजीव पाटील बनले नवे महापौर

वसई: राजकीय चुरशीच्या वातावरणात वसई-विरार महानगरपालिकेवर बहुजन विकास आघाडीने (BVA) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पक्षाचे उमेदवार अजीव पाटील यांची महापौरपदी निवड झाली असून, त्यांनी भाजपच्या आव्हानाचा पराभव करत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. मात्र, भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी बविआने आपली मते शाबूत ठेवत अजीव पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

उल्हासनगर महापौर(Ulhasnagar Mayor 2026): मुख्यमंत्री शिंदेंची ‘पॉवर’ गेम! महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम यांची वर्णी

उल्हासनगर: राज राजकीय घडामोडींनंतर उल्हासनगर महानगरपालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या प्रक्रियेत अश्विनी निकम यांची महापौरपदी निवड झाली असून, पालिकेवर भगवा फडकला आहे. उल्हासनगरमधील सत्तास्थापनेची सर्व गणिते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अत्यंत कौशल्याने जुळवून आणली. विविध राजकीय गटांशी समन्वय साधून आणि स्थानिक समीकरणांची अचूक बांधणी करून त्यांनी महापौरपदावर शिवसेनेचा (शिंदे गट) उमेदवार बसवण्यात यश मिळवले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp