
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील काही भागात येत्या 2 दिवसात म्हणजेच 8 जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.कोकण आणि घाट परिसर तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात रविवार (6 जुलै) आणि सोमवार (7 जुलै) रोजी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे, तर मुंबईत ‘यलो अलर्ट’ आणि ठाणे तसेच पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या गंगेच्या खोऱ्यात आणि लगतच्या भागात हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातावरण निर्माण झाले आहे. गुजरातपासून पश्चिम बंगालच्या उत्तर भागापर्यंत द्रोणीय स्थिती (ट्रफ लाइन) तयार झाली आहे, जी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांवर परिणाम करत आहे. याशिवाय, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरही द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली.
कोकण आणि घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे आणि सातारा घाट परिसरात 6 आणि 7 जुलै रोजी अतितीव्र पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या घाट परिसरात सोमवारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर रत्नागिरीत मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. पुणे जिल्ह्यात मध्यम पाऊस अपेक्षित आहे, परंतु घाट परिसरात अतितीव्र पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस
मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र, घाटमाथ्याच्या पलीकडील पठारी प्रदेशात पावसाचा जोर मध्यम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सतर्कतेचा इशारा
पुणे आणि सातारा घाट परिसरातील ‘रेड अलर्ट’मुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ असल्याने पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.हवामान खात्याने सर्व नागरिकांना पावसाळी परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत सावध राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.