
Maharashtra Weather News : मागील 24 तासांपासूनच महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये समुद्रात सुरू असणाऱ्या अनेक हालचाली पाहता त्याचा थेट परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसत आहे. भर मे महिन्यात राज्याला जून- जुलैप्रमाणं पावसानं झोडपून काढलं आहे. तर, शेतशिवाराचं या पावसानं मोठं नुकसानही केलं आहे. पुढचे काही दिवस ही परिस्थिती सुधरणार नसून राज्यावर हे अस्मानी संकट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
समुद्र खवळलाय… चक्रीवादळसदृश्य परिस्थितीमुळं भीतीचं वातावरण…
राज्याच्या कोकण आणि गोवा किनारपट्टीलगत असणाऱ्या पूर्वमध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून, पुढच्या 36 तासात वाऱ्याची ही प्रणाली अधिक तीव्र होणार आहे. ज्यामुळं मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. या इशाऱ्यानुसार राज्याच्या रायगड आणि रत्नागिरी भागाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
23 May, Latest satellite obs at 6.30 am indicate West Coast konkan, parts of madhya Maharashtra almost covered with mod intensity clouds. S konkan to be watched please.
Cloud mass over Arabian Sea moved Northerly, a slow moving system.
Take care. pic.twitter.com/2I1gp1553y— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 23, 2025
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टी क्षेत्रात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली असल्यामुळं या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो अधिक तीव्र होत आहे. ही संपूर्ण प्रणाली उत्तरेच्या दिशेनं आगेकूच करत असून त्याच कारणास्तव महाराष्ट्रावर त्याचा थेट परिणाम होऊन रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा राज्यात जारी करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात सोसाट्याचा वारा वाहणार असून या वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असेल. पश्मिम महाराष्ट्र आणि राज्याच्या घाटमाथ्यावरील भागामध्ये पावसाचा सर्वाधिक मारा असू शकतो. तर, पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती संकटांमध्ये भर टाकू शकते.
मराठवाडा, विदर्भात काय स्थिती?
दरम्यानच्या काळात मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागांतही मुसळधार पावसाची हजेरी असेलय तर, पुढील पाच ते सात दिवस विदर्भात अवकाळी पावसाचं सावट पाहायला मिळेल. 24 मे रोजी पश्चिम विदर्भात सोसाट्याच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.