
मुंबईमध्ये शुक्रवारी झालेला पाऊस थोडासा दिलासा देणारा होता. मात्र, शनिवार आणि रविवार या वीकेंडमध्ये काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. दक्षिण कोकणासाठी रविवारी आणि सोमवारी, तर पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यांसाठी सोमवारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
शुक्रवारी मुंबईत दिवसभर पावसाची हजेरी
शुक्रवारी मुंबईत दिवसभर पावसाची हजेरी होती. कुलाबा वेधशाळेने २२ मिमी, तर सांताक्रूझने ८ मिमी पावसाची नोंद केली. १ जूनपासून एकूण पावसाचा आकडा पाहता, कुलाबामध्ये ५६२ मिमी, तर सांताक्रूझमध्ये ४९६ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. सर्वाधिक पाऊस कुलाबा भागात झाला.
नवी मुंबईत पावसाने चांगली हजेरी
दुसरीकडे, नवी मुंबईत पावसाने चांगली हजेरी लावली. मुंबईत दुपारी समुद्राची भरती असल्यामुळे किनारपट्टी भागात मोठ्या लाटा उसळल्या, मात्र त्याच दरम्यान पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे शहरात पाणी साचण्याची परिस्थिती टळली.
दरम्यान, वायव्य राजस्थानजवळ वरच्या थरातील चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे. त्यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढत आहे. मुंबईसाठी सोमवारपर्यंत एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट कायम आहे.
तापमानाची स्थिती काय?
मुंबईत सध्या कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. शुक्रवारी कुलाबा येथे ३० अंश, तर सांताक्रूझ येथे ३१.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आर्द्रतेमुळे किमान तापमानसुद्धा वाढले आहे. दोन्ही ठिकाणी शुक्रवारी २७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
जिल्हानिहाय अलर्ट
- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: शनिवारी येलो अलर्ट; रविवार आणि सोमवारसाठी ऑरेंज अलर्ट
- कोल्हापूर घाटमाथा: शनिवारी येलो अलर्ट, त्यानंतर दोन दिवस ऑरेंज अलर्ट
- पुणे, सातारा घाटमाथा: सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.