
Devendra Fadnavis Maratha Reservation: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी गेल्या 4 दिवसांपासून मुंबईत सुरु असलेलं आंदोलन संपवत उपोषण सोडलं. यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक म्हणत कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे मराठा बांधवांच्या आशा-आकांक्षांना न्याय दिला असं म्हणत बावनकुळेंनी फडणवीसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
प्रवीण दरेकरांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक !! देवा भाऊ मनःपूर्वक अभिनंदन व आभार ! मराठा समाजाच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात आजही आहात आणि उद्याही राहाल हे शासन निर्णयातून दाखवून दिलंत. प्रसंगी आरोप, टीकाही सहन केल्यात ! तमाम समाज बांधवांना आपला अभिमान आहे, पूर्ण विश्वास आहे व राहील. धन्यवाद देवभाऊ”.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, “मराठा समाजाच्या कल्याणासाठी सर्वाधिक कल्याणकारी व दूरगामी निर्णय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आले आहेत. त्यामुळेच मराठा बांधवांच्या अपेक्षा आदरणीय देवेंद्रजी व महायुती सरकारकडून होत्या. परंतु, एका समाजासाठी निर्णय घेताना दुसऱ्या समाजाच्या मनामध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये व दोन समाज एकमेकांच्या समोर उभे राहू नयेत, हा सर्वंकष दृष्टिकोन आदरणीय देवेंद्रजींचा सदैव राहिलेला आहे. समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या व प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, हाच प्रयत्न आदरणीय देवेंद्रजींनी कायम केला आहे. याच अनुषंगाने श्री. राधाकृष्ण विखे पाटील जी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ उपसमितीने अतिशय मेहनतीने व अभ्यासपूर्वक मसुदा तयार केला व त्याला श्री मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व मराठा बांधवांनी मान्यता दिली”.
देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक !!
देवा भाऊ मनःपूर्वक अभिनंदन व आभार !
मराठा समाजच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात आजही आहात आणि उद्याही राहाल हे शासन निर्णयातून दाखवून दिलंत. प्रसंगी आरोप, टीकाही सहन केल्यात !
तमाम समाज बांधवांना आपला अभिमान आहे, पूर्ण विश्वास आहे व राहील.
धन्यवाद… pic.twitter.com/RsBLyEMQsP— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 2, 2025
फडणवीस आरक्षणाच्या जीआरवर काय म्हणाले?
“मराठा समाजाच्या हिताचा तोडगा मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला. त्यामुळे उपोषण आता संपवण्यात आलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती. मात्र मनोज जरांगे याची सरसकटची मगणी होती. पण त्यात कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाहता सरसकट करणं शक्य नव्हतं. ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून दिलं. आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण समूहाला नसून, व्यक्तीला मिळत असतं आणि त्याने तो दावा करायचा असतो. त्यांनीदेखील काल ती भूमिका समजून घेतली, स्विकारली आणि कायद्यात सरसरकट बसत नसेल तर करु नका सांगितलं. त्यातून तोडगा निघाला आणि उपसमितीने उपसमितीने चर्चा करुन मसुदा तयार केला आणि आता जीआर काढला आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
“मला उपसमिती अध्यक्ष विखे पाटील आणि सर्वांचं अभिनंदन करायचं आहे. त्यांनी सातत्याने अभ्यास, बैठका, चर्चा करुन मार्ग काढला आहे. मार्ग निघाल्यामुळे मराठवड्यात राहणारे मराठा समाजाचे लोक ज्यांचा कधीकाळी त्यांच्या रक्त नात्यातील कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना नियमाने प्रमाणपत्र देता येतं. हैदराबाद गॅझेटमुळे या नोंदी शोधणं सोपं होईल. फॅमिली ट्री स्थापित करुन आरक्षण देता येणार आहे. म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सर्वांना ते आरक्षण मिळेल,” असंही त्यांनी सांगितलं.
“ओबीसी समाजात जी भीती होती, सरसकट सगळे आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेदेखील आरक्षण घेतील, तसंच इतरही समाजाचे घुसण्याचा प्रयत्न करतील. तर अशाप्रकारे होणार नाही. ज्यांचा खरा दावा आहे, पण कागदपत्रांच्या अभावी मिळत नव्हता अशा समाजाच्या लोकांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी अतिशय चांगला निर्णय आहे. मराठवाड्यात रेकॉर्ड्स नसल्याने त्यांच्यासाठी मोठा प्रश्न होता. त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा काढू शकलो आहोत जो कोर्टातही टिकेल आणि लोकांना फायदा होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केली आहे.
“राजकारणात टीकाही सहन करावी लागते आणि लोक स्वागतही करतात. जेव्हा टीका झाली तेव्हाही विचलित झालो नाही. कारण माझ्यासमोर समाजाला न्याय द्यायचा आहे आणि दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत, तेढ निर्माण होणार नाही, अन्यायाची भावना येणार नाही असा कायदेशीर निर्णय करावा लागेल. म्हणून यासंदर्भात जे कायदेशीर आहे त्याचा अभ्यास करुन निर्णय घेतला आहे. याचं श्रेय मंत्रिमंडळ उपसमितीला द्यावं लागेल. यापुढेही सातत्याने ते काम करत राहतील,” असं ते म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी म्हटलं की, “मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी समाजासाठी कालही काम करत होतो आणि उद्याही करत राहीन. मराठा, ओबीसी किंवा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येकासाठी काम करणं माझं कर्तव्य मानतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या, तर कधी फुलांचे हार मिळतात”.
‘एकनाथ शिंदे-अजित पवारांकडे दुर्लक्ष’
सुषमा अंधारे यांनी या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला आहे. “भाजपाचे सगळे नेते एक जात ट्विट करत आहेत की जे मातब्बर मराठा नेत्यांना जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवलं. भाजपा नेत्यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे वाशीमध्ये आंदोलकांच्या समोर छत्रपती शिवरायांच्या पायाची शपथ घेऊन शब्द न पाळणाऱ्या एकनाथ शिंदेंकडे, की सत्तेत असणारे दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादांकडे? भाजपाने ते शिंदे आणि पवार दोघांनाही चक्क मोडीत काढून देवेंद्र फडणवीस यांना हिरो क्वालिटीचे दाखवत आहेत”, असा आरोप त्यांनी केला आहे.
FAQ
1) मराठा समाजाला कुणबी दर्जा का हवा आहे?
कुणबी ही महाराष्ट्रात OBC प्रवर्गात समाविष्ट असलेली जात आहे. मराठवाड्यातील काही मराठ्यांना पूर्वी हैदराबाद गॅझेट (१९१८) अंतर्गत कुणबी म्हणून ओळखले जात होते. जर मराठ्यांना कुणबी दर्जा मिळाला, तर त्यांना OBC प्रवर्गातील शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळू शकतो.
2) सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या?
मराठा आंदोलनाच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या:हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दर्जा देणे.
आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे आश्वासन.
इतर गॅझेट्स (सातारा, औरंगाबाद, मुंबई) लागू करण्यासाठी एक महिन्याची मुदत.
कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण लवकर सुरू करणे.
3) आंदोलन का संपले?
२ सप्टेंबर २०२५ रोजी, महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दर्जा देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासकीय ठराव (GR) जारी करण्याचे आश्वासन दिले. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आणि आंदोलन संपवले. त्यांनी याला “मराठा समाजाचा विजय” असा उल्लेख केला
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.