
Microsoft Layoff: जगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट सध्या अभूतपूर्व यशाच्या शिखरावर आहे. कंपनीच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होतेय. असं असतानाही कंपनीने अलीकडेच 15 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नाडेला यांनी या निर्णयाबाबत दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी कंपनीतील 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना एक पत्र (मेमो) लिहून या कपातीमागील कारणे सांगितली. तसेच कंपनीच्या भविष्यातील योजनांबाबत स्पष्टता आणली. त्यांचे हे पत्र वाचून सर्वसामान्यांन नोकरदारवर्गालाही धडकी भरेल.
मायक्रोसॉफ्टची भविष्यातली योजना काय?
मायक्रोसॉफ्ट आता केवळ सॉफ्टवेअर कंपनी म्हणून राहू इच्छित नाही, तर ती कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात आघाडीची कंपनी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात अलीकडील कर्मचारी कपातीमुळे आपल्याला तीव्र दुख: झाल्याचे नमूद केले आहे. त्यांनी या निर्णयाला कंपनीच्या इतिहासातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. या कपातीचा परिणाम आपल्या सहकाऱ्यांवर, सांघिक सहकाऱ्यांवर आणि मित्रांवर झाला आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले. या पत्रात नाडेला यांनी कर्मचारी कपातीमागील कारणे आणि कंपनीच्या भविष्यातील दृष्टिकोनाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचारी कपात का झाली?
सत्या नाडेला यांनी कर्मचारी कपातीमागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, भविष्याच्या दृष्टिकोनातून मायक्रोसॉफ्टला ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वत:ला तयार करावे लागेल. कंपनी सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात तब्बल 80 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. नाडेला यांनी नमूद केले की, भविष्यात लोक त्यांच्या बोटांच्या टोकावर संशोधक, तज्ञ किंवा कोडिंग एजंट्सना बोलावू शकतील, आणि याचा संदर्भ त्यांनी AI च्या वाढत्या वापराशी जोडला. त्यांनी पुढे सांगितले की, AI मुळे निर्माण झालेल्या बदलांमुळे यंदा अनेक नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, ही कर्मचारी कपात मायक्रोसॉफ्टच्या जागतिक कर्मचारी संख्येच्या 7 टक्के इतकी आहे. तरीही, कंपनीने गेल्या काही तिमाहींमध्ये सातत्याने नफा कमावला असून, वाढीचा टप्पा कायम राखला आहे.
AI बाबत नाडेला यांना काय वाटत?
सत्या नाडेला यांनी आपल्या पत्रात कबूल केले की, कर्मचारी कपातीमुळे त्यांना दुख: झालंय. पण कंपनीला AI क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी हे पाऊल आवश्यक होते. मायक्रोसॉफ्टचे ध्येय आता केवळ सॉफ्टवेअर कंपनी म्हणून राहण्याचे नसून, एक अग्रगण्य AI कंपनी बनण्याचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धेत पुढे राहण्यासाठी बदल करणे गरजेचे असल्याचे नाडेला यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्टची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती AI चा वापर करू शकेल, ज्यामुळे लोकांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल. AI हे भविष्य आहे, आणि मायक्रोसॉफ्ट या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
कर्मचाऱ्यांना कसं केलं आश्वासित?
मायक्रोसॉफ्टचा हा निर्णय कंपनीच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. सध्याच्या तंत्रज्ञान क्षेत्रात AI ची वाढती मागणी आणि त्याचा विस्तार लक्षात घेता, मायक्रोसॉफ्टने आपले लक्ष सॉफ्टवेअरपासून AI कडे वळवले आहे. कंपनीच्या या दृष्टिकोनामुळे कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागला असला, तरी यामागे ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीशी जुळवून घेण्याची गरज आहे. कंपनी त्यांच्या योगदानाची कदर करते आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे असे म्हणत नाडेला यांनी आपल्या पत्रात कर्मचाऱ्यांना आश्वासित केले आहे.
कर्मचाऱ्यांसोबतच जगाला काय दिला संदेश?
मायक्रोसॉफ्टचा हा निर्णय कठोर असला तरी कंपनीच्या AI क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजनांचा आणि भविष्यातील वाढीचा एक भाग आहे. मायक्रोसॉफ्ट केवळ सॉफ्टवेअर कंपनी राहणार नाही, तर AI च्या युगात एक नाविन्यपूर्ण आणि आघाडीची कंपनी बनण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सत्या नाडेला यांनी आपल्या पत्रातून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणि जगाला स्पष्ट केलंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.