
Mulund Accident: कळवा परिसरात एका कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. घर सजवले जात होते, पाहुण्यांची ये-जा सुरू होती आणि लग्नाच्या तयारीत सगळे व्यस्त होते. आजोबा आपल्या नातीच्या लग्नासाठी विशेष उत्सुक होते. सकाळपासूनच मंडप, जेवणावळ आणि स्वागताच्या तयारीत कुटुंबातील सदस्य गुंतले होते. पण काही तासांतच या आनंदावर दुःखाचे सावट आले. मुलुंडमध्ये अचानक झालेल्या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर आघात झाला आणि जिथे लग्नाचे मंगलध्वनी घुमायचे होते, तिथे शोककळा पसरली.
लग्नाच्या तयारीत असताना घडली दुर्घटना
काही कामानिमित्त रामधन यादव हे 2 नातेवाईकांसह स्वतःच्या रिक्षाने मुलुंडच्या दिशेने निघाले होते. प्रवास सुरू असतानाच भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि रामधन यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले दोघे जखमी अवस्थेत वाहनाखाली अडकले. आसपासच्या नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना बाहेर काढले आणि जवळच्या उपासनी रुग्णालयात दाखल केले.
जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार
जखमींपैकी राजकुमार यादव हे रिक्षा चालवत होते, तर रामधन यादव आणि महेंद्र यादव मागील बाजूस बसले होते. राजकुमार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तपासणीनंतर रामधन यादव यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे जिचे लग्न ठरले होते ती मुलगी राजकुमार यांचीच भाची असल्याचे समोर आले. त्यामुळे कुटुंबातील आनंदाचे वातावरण एका क्षणात शोकात बदलले.
टीव्हीवरील बातमीने नातेवाईकांना धक्का
कुटुंबातील काही सदस्यांना या अपघाताची माहिती प्रथम वृत्तवाहिनीवरून मिळाली. घरातील व्यक्ती कामासाठी बाहेर गेल्याचे माहित असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. नंतर पोलिसांनी फोन उचलून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक तातडीने रुग्णालयात पोहोचले.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
रुग्णालयात एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे बाहेरच नातेवाईकांची गर्दी झाली होती. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर भागातील असून सध्या कळव्यात वास्तव्यास आहे. नातीच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेले कुटुंबीय आता अंत्यसंस्काराची तयारी करत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सनई-चौघड्यांचे सूर विरले आणि घरात शोककळा पसरली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



