
Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईकरांसाठी घर घेण्याची सोपी आणि जलद संधी निर्माण झालीय. म्हाडा मुंबई बोर्डाने एकूण 118 घरे विक्रीसाठी काढली आहेत. यात पहिला येणाऱ्यास प्राधान्य असा साधा नियम लागू आहे. नोंदणी सुरु झाली आहे. कुठे आणि किती आहेत ही घरे? कशी आणि कधीपर्यंत करायची नोंदणी? सविस्तर जाणून घेऊया.
ही घरे कोणकोणत्या भागात?
118 घरांपैकी 82 घरे म्हाडाच्या स्वतःच्या वसाहतींमध्ये आहेत. यात कांदिवली शिंपोलीत 8, चांदकोप सेक्टर-8 मध्ये 1, वडाळा अंटोप हिलमध्ये 27, पवई तुंगात 42, मालाड मालवणी आणि गायकवाड नगरमध्ये प्रत्येकी 1 अशी घरे आहेत. उरलेली 36 घरे विकास नियंत्रण नियम 33(5)(7)58 अंतर्गत मिळालेली आहेत. यात घाटकोपर पूर्वी 2, विक्रोळी कन्नमवार नगरात 1, वडाळ्यात 8, भायखळ्यात 6, ताडदेवमध्ये 6, लोअर परळमध्ये 8, सायनमध्ये २ आणि अंधेरी पश्चिम जेव्हीपीडीत 7 घरे आहेत. सर्व घरे मुंबईतील सोयीच्या ठिकाणी आहेत.
कोण अर्ज करू शकतो?
अर्ज करण्यासाठी वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि भारतीय नागरिक असावा. महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षांत किमान 15 वर्ष सलग राहिलेले असावे. यासाठी जानेवारी 2018 नंतर दिलेले बारकोड असलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड घ्या. लग्न झाले असेल तर पती-पत्नी दोघांचे, घटस्फोट झाला असेल तर कोर्टाचा निकाल घ्या. आरक्षण घ्यायचे असेल तर जातीचे प्रमाणपत्र किंवा पडताळणी प्रमाणपत्र हवे. दोघांचा ईमेल आयडी आणि आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर अनिवार्य आहे.
अर्ज कसा भरायचा?
सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. प्रथम वेबसाइटवर नोंदणी करा. मुख्य अर्ज, अनामत रक्कम भरुन घर निवडणे ही प्रक्रिया 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल. अनामत रक्कम भरल्यावर तुम्हाला उपलब्ध घरे दिसतील. हवे असलेले घर, मजला, विंग निवडा. एका अनामत रकमेवर फक्त एक घर एकदा निवडता येईल. नंतर प्रिंट काढून सर्व माहिती तपासा. अर्ज भरल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही, म्हणून काळजीपूर्वक भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पैसे कसे भरावे?
घर निवडल्यानंतर 48 तासांच्या आत घराच्या किमतीच्या 10 टक्के रक्कम भरा. ही रक्कम न भरल्यास तुमचा दावा रद्द होईल आणि अनामत पैसे परत मिळणार नाहीत. 10 टक्के भरल्यानंतर 90 दिवसांत बाकीची रक्कम भरा. कर्ज घ्यायचे असेल तर बँकेचे प्री-सँक्शन लेटर अपलोड करा. पूर्ण पैसे आणि स्टॅम्प ड्यूटी भरल्यानंतरच घराचे ताबा पत्र मिळेल. वेळेत पैसे न भरल्यास व्याजासह मुदतवाढ मिळू शकते, पण शेवटी न भरल्यास घर रद्द होईल.
म्हाडाने काय केले आवाहन?
म्हाडाने कोणत्याही दलाल किंवा एजंटची नेमणूक केलेली नाही. कोणी पैसे मागितले किंवा अर्ज विकतो असे दिसले तर लगेच सांगण्याचे आवाहन म्हाडाने केले. फसवणुकीसाठी दूरध्वनी क्रमांक 022-66405448 किंवा 022-66405123 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मदतीसाठी हेल्पलाइन 9869988000 किंवा ईमेल dycoem1@gmail.com वापरा. जाहिरात आणि माहिती पुस्तिका पूर्ण वाचून त्यानंतर अर्ज करा. म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://bookmyhome.mhada.gov.in वर आजपासून नोंदणी सुरू झाली. यापूर्वी 3 फेब्रुवारीला जाहिरात झाली होती, पण काही तांत्रिक अडचणी आल्याने काम थांबवले होते. आता सर्व काही तयार असल्याने इच्छुक नागरिकांनी ताबडतोब नोंदणी करावी, असे म्हाडाने आवाहन केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



