
Nitesh Rane On Shivsena UBT Vasant More Aghori Pooja Claims : भरत गोगावलेंनी निवडणूक जिंकण्यासाठी बगलामुखी यज्ञ केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. वसंत मोरेंनी या संदर्भात एक व्हिडिओच समोर आणला होता. मात्र या आरोपाचं ठाकरेंच्या शिवसेनेवर बुमरँग होताना दिसतंय. कारण अघोरी पूजेवरून मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंवरच आरोप केलेत.
रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत रश्मी ठाकरेंवर आरोप केला होता. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं भरत गोगावलेंवर पलटवार करत अघोरी पूजेचा एक व्हिडीओ समोर आणला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी हा गोगावलेंचा हा व्हिडिओ समोर आणला होता. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या अघोरी पूजेच्या आरोपाचं बुमरँग झाल्याचं पाहायला मिळतंय. या वादात मंत्री नितेश राणेंनी उडी घेतलीय. अघोरी पूजा काय असते हे मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर विचारा असं म्हणत नितेश राणेंनी जोरदार पलटवार केलीय. तर अघोरीपूजेत उद्धव ठाकरे तज्ज्ञ असल्याचं म्हणत नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.
काय म्हणाले नितेश राणे?
मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर किती अघोरी पुजा सुरू होत्या हे मी तारखेसह सांगू शकतो. कॅलेंडर सुद्धा देऊ शकतो कधी कधी काय काय कापलं जात आणि मीठ कुठ ठेवलं जात. कर्जतच्या फार्महाऊसमधे जमिनीखाली काय काय पुरलं आहे हे सुद्धा सांगू शकतो.
दरम्यान अघोरी विद्येचा प्रयोग फक्त कलानगरमध्येच केला जातो असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी गोगावलेंचा एक व्हिडीओ समोर आणला होता. या व्हिडिओत भरत गोगावले बगलामुखी यज्ञ करत असल्याचा दावा मोरेंनी केला होता. राजकीय विरोधकांवर मात करण्यासाठी उज्जैनच्या पुजा-यांना बोलावून हा यज्ञ केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला होता.
वसंत मोर नेमकं काय म्हणाले?
वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. हे आरोप करताना मोरे यांनी काही व्हिडीओदेखील समोर आणले आहेत. भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी त्यांच्या घरी अघोरी पूजा केली होती. त्यासाठी गोगावले यांनी गुवाहाटीच्या बगलामुखी येथून महाराज आणले होते. निवडणुकीच्या अगोदर त्यांनी ही अघोरी पूजा केली होती, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केलाय. हा आरोप करताना भरत गोगावले यांनी काही व्हिडीओही समोर आणले आहेत.
मंत्री भरत गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप करून ठाकरेंच्या शिवसेनेनं खळबळ उडवून दिली होती. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेवरच त्या आरोपाचं बुंमरँग झालंय. आणि अघोरी पूजेचे आरोप थेट मातोश्रीपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून याला काय प्रत्यूत्तर दिलं जातंय तो पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.