
Pune Indrayani Kundmala Bridge Collapse: पुलावर दुचाकी नसत्या तर कदाचित दुर्घटना टळली असते…? pune briपुण्यातील मावळ येथे इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथील पूल नदीत कोसळून रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मदतकार्य सुरु असतानाच या दुर्घटनेसंदर्भातील धक्कादायक तपशील समोर आला आहे. येथील प्रत्यक्षदर्शीने खळबळजनक खुलासा केला आहे.
…तर दुर्घटना टळली असती
कुंडमळा येथील पूल पडण्यासाठी पुलावर झालेली गर्दी कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही गर्दी वाढण्यामागे पुलावर आलेल्या दुचाकी कारणीभूत असल्याचे या अपघातात जखमी झालेल्या पर्यटकांनी सांगितले आहे. मुळातच चार फूट रुंद असलेल्या पुलावर दुचाकी आल्या आणि पुलावर जाणे येणे अशक्य झाले. पुलावर प्रचंड गर्दी झाल्याचं अपघातातील जखमी पर्यटकांनी सांगितलं आहे. अरुंद पूल आणि त्यात दुचाकी त्यामुळे पर्यटक एकाच जागी अडकले आणि पुलावर प्रचंड भार पडल्याने पूल कोलमडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. त्यामुळेच पुलावर दुचाकी नसत्या तर कदाचित दुर्घटना टळली असती असं सांगितलं जात आहे.
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
“गावकरी आणि बाहेरुन आलेल्यांमुळे पुलावरील रस्ता बंद झाला. चालत जाणाऱ्यांना अडथळा निर्माण झाला. सगळेच एका जागी अडकून पडल्याने पुलावरील वजन वाढल्याने तो पडला,” असं प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलं आहे. “दहा मिनिटं दोन्ही बाजूचे दुचाकीस्वार आमने-सामने आले आणि कोण मागे जाणार यावरुन त्यांची चर्चा सुरु असतानाच लोकांची गर्दीही वाढली,” असं प्रत्यक्षदर्शी म्हणाला.
पर्यटकांची मोठी गर्दी
समोर आलेल्या माहितीनुसार कुंडमळा येथील दुर्घटनाग्रस्त पूल हा अवघा 30 वर्ष जुना होता. मात्र या पुलाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे प्रशासनाकडून फारसे लक्ष दिले जात नव्हते. यामुळेच पुलाची स्थिती सतत खालावत गेली आणि जास्त भारामुळे तो रविवारी कोसळला. हा पूल राज्य सरकारने बांधला होता. पूल जुना झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रविवारी 100 हून अधिक लोक सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येथे जमले आणि पर्यटकांच्या जास्त वजनामुळे पूल कोसळल्याचं प्राथमिक माहितीनुसार सांगितलं जात असून आता याला प्रत्यक्षदर्शींच्या दाव्याने पाठबळ मिळालं आहे.
आठ कोटींचा निधी मंजूर झालेला
मावळ तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या कुंडमळा येथे नवीन पुलाच्या बांधकामास मंजुरी देऊन निधी देखील देण्यात आला होता. कुंडमळा येथे जुना कोल्हापूर पद्धतीचा साकव पूल आहे. हा साकव पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक अपघात झाले असून या पुलावरून धोकादायक पद्धतीने वाहने चालवून अनेकदा धोका निर्माण होत आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. त्यावेळी ते याच पुलाचा वापर करतात. मात्र स्थानिक भाजप नेते रविंद्र भेगडे यांनी अनेक वर्षांपासून हा पूल करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले. मागच्या पावसाळी अधिवेशनात इंदोरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जोडरस्ता व मोठ्या पुलाच्या बांधकामास 8 कोटी रुपये इतका निधी शासनाने मंजूर केला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.