
Pune Crime: पुण्यातील भारती विद्यापीठाच्या आसपास एक भयानक आणि हृदयद्रावक घटना घडलीय. वेश्याव्यवसायात गुंतलेल्या एका महिलेवर अत्याचार करून तिला दगडाच्या खाणीत ढकलून तिचा खून करण्यात आला. खडी मशीन चौकाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने हालचाल सुरू केल्याने प्रकरण उघडकीस आले. या प्रकारामुळे शहरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्तीने एका रिक्षात बसवले. नंतर पीडित महिलेस निर्जन भागात नेण्यात आले. तिथे त्यांच्यात जोरदार भांडण झाले. संतापलेल्या आरोपींनी तिला लाकडी काठीने मारहाण केली. शेवटी एका आरोपीने तिला खाणीच्या कडेवरून खाली ढकलून दिले. यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शंका आहे. ही सगळी कारवाई रात्रीच्या वेळी झाली.
पोलिसांच्या तपासाची कामगिरी
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या टीमने त्वरित हालचाल केली. तांत्रिक साधने, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीचा वापर करून आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांनी रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांवर लक्ष केंद्रित केले. पूर्वनियोजित कट असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सध्या तपास अधिक खोलात नेला जात आहे.
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
दोन आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. उर्वरित चार जणांना लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या घटनेमुळे पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. नागरिकांकडून पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी जोरात होत आहे. पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
6 आरोपी, चौघांचा शोध सुरु
या गुन्ह्यात एकूण 6 जणांचा सहभाग असल्याचे पोलिसांना समजले आहे. त्यापैकी दोन आरोपींना आतापर्यंत पकडण्यात यश आले आहे, तर उरलेल्या 4 जणांचा शोध सुरू आहे. आरोपींनी रिक्षाचे हूड बदलून सीसीटीव्ही कॅमेर्यात चेहरा दिसू नये म्हणून आधीच तयारी केली होती. यावरून हा कट आधीच रचला गेला असल्याचे दिसते. पोलिस तपासात त्यांची नावे आणि भूमिका स्पष्ट होत आहेत.
बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये धडक कारवाई सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी स्पा सेंटरवर कारवाई करत 207 महिलांची सुटका केली होती. आता बुधवार पेठेत सर्च ऑपरेशन करुन 11 बांगलादेशी महिलांसह 22 जणांना अटक केली आहे. या 11 बांगलादेशी महिलांना बोगस आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे अवैधरित्या भारतात आणण्यात आले होते. त्यामुळे या महिलांवर अनधिकृपणे कुंटणखान्यांमध्ये काम करत असल्याचा आरोप पोलिसांनी करत त्यांना ताब्यात घेतलं आहे.यापूर्वीही पुणे पोलिसांनी 11 फेब्रुवारीला बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन केलं होतं. ही कारवाई मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान 41 इमारती आणि गल्लीबोळांमध्ये करण्यात आली होती. या परिसरात पोलिसांनी एक एक जागा सर्च केली होती. या कारवाई दरम्यान 700 हून अधिक नागरिकांची चौकशी केली गेली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



