
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. समृद्धी मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीचे काम सध्या सुरु आहे. या कामामुळे तब्बल 16 दिवसांचा ब्लॉक होणार आहेत. या ब्लॉकचा प्रवाशांवर काय परिणाम होणार? तसेच प्रवाशी पर्यायी कोणता मार्ग निवडू शकता याबाबत समजून घ्या.
हा ब्लॉक कधी असेल?
या कामामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7 ते 23 फेब्रुवारी दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. या 16 दिवसांच्या कालावधीत तब्बल 35 ठिकाणी समृद्धी महामार्गावर थांबाव लागणार आहे.
समृद्धी महामार्गावर ब्लॉक
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महामार्गावरील ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (HTMS) अधिक सक्षम करण्यासाठी गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात 7 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून वाहतूक या काळात बंद असणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर सुरक्षितता आणि आधुनिक वाहतूक नियोजनासाठी गॅन्ट्री उभारणे आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 35 टप्प्यांमध्ये हे काम नियोजित करण्यात आले आहे. या प्रक्रियेत महामार्गावर लोखंडी सांगाडे (गॅन्ट्री) बसवले जातात, ज्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि माहिती देणारे फलक लावले जातात.
हे काम करत असताना मुंबई आणि नागपूर या दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक दिवसातील ठराविक वेळेत 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे रोखली जाईल. याचा थेट परिणाम मेहकर परिसरातील प्रवासावर याचा मोठा परिणाम होणार आहे. काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल, मात्र या एक तासाच्या काळात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने वाहनधारकांना या कालावधीत पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे किंवा प्रवासाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
विविध तारखांना वेगवेगळ्या टप्प्यांवर होणार वाहतूक बंद
7 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या 16 दिवसांच्या कालावधीत विविध तारखांना रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत तसेच दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. यामध्ये मुंबई व नागपूर वाहिनीवर अनुक्रमे कि.मी. 178.900 , 179.750, 183.700 , 185.500, 190.400 , 200.400, 205.400 , 208.200, 208.850 , 238.550, 242.600 , 245.400, 250.500, 260.400, 264.800 , 270.400, 280.400 , 281.400 व 283.900 या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गाला पर्यायी मार्ग
पर्यायी मार्ग म्हणून नागपूर — अमरावती — अकोला — धुळे — नाशिक — मुंबई (NH 6 आणि NH 3). या एका मार्गाचा वापर करु शकता. तसेच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ते नाशिक हा देखील एक पर्याय असू शकतो. समृद्धीवरील ब्लॉकमुळे या पट्ट्यात अडचण येत असल्यास पर्यायी मार्ग म्हणून छत्रपती संभाजीनगर — वैजापूर — येवला — निफाड — नाशिक हा तिसरा पर्यायी मार्ग वापरता येऊ शकतो.
समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स
– Google Maps चा वापर: प्रवासाला निघण्यापूर्वी Google Maps वर ‘Live Traffic’ नक्की तपासा.
– वेळेचे नियोजन:किमान २-३ तास जास्तीचे ठेवूनच प्रवासाला निघा.
– दिवसा प्रवास करा: जर तुम्ही अपरिचित पर्यायी मार्गावरून जाणार असाल, तर सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीऐवजी दिवसा प्रवास करणे अधिक श्रेयस्कर ठरेल.
– इंधन आणि खाद्यान्न: पर्यायी मार्गावर समृद्धीसारखे ठराविक अंतरावर ‘Way Side Amenities’ नसतील, त्यामुळे गाडीत पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



