
Solapur Municipal Corporation Election Main Fights: सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एकूण 102 जागा असलेल्या सोलापूर महापालिकेसाठी 26 प्रभागांमधून नगरसेवकांची निवड होणार आहे. पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांचे पक्षांतर, नव्या उमेदवारांना मिळालेली संधी आणि सामाजिक समीकरणांमुळे काही प्रभागांमध्ये निकाल कोणाच्या बाजूने लागेल, हे सांगणं अवघड ठरत आहे. अशाच काही महत्त्वाच्या आणि तुल्यबळ लढती पुढीलप्रमाणे
1) प्रभाग क्रमांक 5 – ड
भाजपचे बिज्जू प्रधाने विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे गणेश पुजारी, तसेच अपक्ष राजू आलूरे
या प्रभागात भाजपने नुकताच पक्षात प्रवेश केलेल्या बिज्जू प्रधाने यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या निर्णयामुळे भाजपातील काही जुने कार्यकर्ते नाराज झाले असून, त्यापैकीच राजू आलूरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे भाजपाची मतं फुटण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीचे गणेश पुजारी यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची ठरत आहे.
2) प्रभाग क्रमांक 7 – ड
भाजपचे पद्माकर काळे विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) चे अमोल शिंदे
भाजपाने या प्रभागात नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) कडून अमोल शिंदे रिंगणात असून, ही लढत जिल्हाप्रमुखांच्या प्रतिष्ठेशी जोडली गेली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू असून, निकाल शेवटच्या क्षणापर्यंत लटकता राहण्याची शक्यता आहे.
3) प्रभाग क्रमांक 15 – ड
काँग्रेसचे चेतन नरोटे विरुद्ध भाजपचे अंबादास करगुळे
या प्रभागातील लढत राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेले चेतन नरोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे त्यांच्याविरुद्ध भाजपाकडून लढणारे अंबादास करगुळे हे काही काळापूर्वीपर्यंत काँग्रेसमध्येच सक्रिय होते. त्यामुळे ही लढत वैयक्तिक राजकारण आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी ठरली आहे.
4) प्रभाग क्रमांक 15 – क
भाजपचे विनोद भोसले विरुद्ध काँग्रेसचे आरिफ शेख
विनोद भोसले यांची ओळख दीर्घकाळ काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत ते भाजपकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून आरिफ शेख निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या प्रभागात ‘निष्ठा विरुद्ध पक्षांतर’ असा मुद्दा चर्चेचा ठरत असून, मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
5) प्रभाग क्रमांक 20 – ड
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तोफिक शेख विरुद्ध भाजपचे अमीर शेख
हा प्रभाग मुस्लिमबहुल म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे सोलापूरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजपने या प्रभागात मुस्लिम उमेदवार दिला आहे. त्यामुळे या निर्णयाकडे राजकीय दृष्टिकोनातून विशेष लक्ष दिलं जात आहे. राष्ट्रवादीचे तोफिक शेख यांचे या भागात चांगले प्रस्थ असले तरी भाजपचे अमीर शेख नव्या समीकरणांमुळे जोरदार लढत देत आहेत.
या प्रमुख प्रभागांमध्ये पक्षांतर्गत बंडखोरी, नव्या चेहऱ्यांना संधी, सामाजिक समीकरणे आणि स्थानिक प्रश्न यामुळे निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेत सत्ता कुणाच्या हाती जाणार, हे या तुल्यबळ लढतींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



