
IAS Success Story: घरात अठरा विश्व् दारिद्र्य, पुजापाठ आणि मिळेल ते मोलमाजुरीच कामं करून मुलाला शिकवलं. दहावीत मुलाला इंग्रजी विषयात केवळ 35 गुण मिळाले. पण मुलानेही प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्वतःला सिद्ध केले आणि यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवले. आयएएस सुनीलच्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊया.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गोलेगाव येथील एका गरीब कुटुंबातला मुलगा आयएएस अधिकारी झालाय. सुनील स्वामी असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील रामलिंग स्वामी पुजापाठ आणि मिळेल ते मोलमजुरीचे काम करत. आईदेखील शेतमजुरीचे काम करायची. काम मिळालं तर दोन वेळचं जेवण मिळायचं. सुनिलला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्या मावशीकडे ठेवण्याचा निर्णय स्वामी दाम्पत्याने घेतला. सुनीलचे प्राथमिकचे शिक्षण खेडकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतून तर माध्यमिक चे शिक्षण माळाकोळी येथील शाळेत झाले.
इयत्ता दहावीमध्ये सुनीलला इंग्रजी विषयात केवळ 35 गुण मिळाले. पण सुनीलने इथूनच जिद्दीने पेटून स्वतःला अभ्यासात झोकून दिले. लातूर येथून सुनीलने बीएससी ऍग्रीचे शिक्षण पूर्ण केले. एमएससी ऍग्रीसाठी सुनीलला फेलोशिप मिळाली आणि सुनील ऍग्री सायंटिस्ट झाला. या सर्व प्रवासात आई वडिलांनी रक्ताचे पाणी करून त्याला होईल तशी मदत केली. सोन्याचे पान मोडून प्रसंगी मुलाला पैसे पाठवले अशी आठवण आईने सांगितली. आपली परिस्थिती सांगताना वडिलांचेही डोळे पानावले.
घराची परिस्थिती खूप बेताची असल्याने खासगी शिकवणी वर्ग घेऊन सुनीलने आपलेही शिक्षण सुरु ठेवले. आपला लहान भाऊ आणि लहान बहिणीच्या शिक्षणासाठी सुनील पैसे पाठवायचा. दररोज सतरा ते अठरा तास अभ्यास, त्यात एकवेळ जेवण करून त्याने हे यश मिळवल्याचे लहान भाऊ वैभव स्वामी सांगतो. ना परिस्थिती ना कोणते पाठबळ असे असताना सर्व संकटाना तोंड देत सुनिलने मिळवलेले हे यश आभाळा एवढे आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.