
Dinanath Mangeshkar Hospital Press Conference: भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आज पत्रकार परिषद घेतली. डॉ धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत रुग्णालयाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमार पाहता त्यांनी अर्ध्यातच पत्रकार परिषद गुंडाळली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 10 लाखांची अनामत रक्कम भरण्यास सांगितल्याने भिसे कुटुंबियांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागलं होतं. या सर्व गडबडीत तनिषा भिसे यांची प्रसूती झाली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला. पण प्रसूतीनंतर तनिषा भिसे यांचं निधन झालं.
पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं?
रुग्णालयात डिपॉझिट घेण्याची पद्धत कधीच नव्हती. 5 ते 10 लाखांच्या पुढे रक्कम असल्यास ती घेतली जात होती, पण ती आता बंद करण्यात आली आहे अशी माहिती डॉ धनंजय केळकर यांनी यावेळी दिली. रुग्णालय जबाबदार आहे असं तुम्ही मानता का? असं विचारलं असता त्यांनी आम्ही अहवालाची वाट पाहत आहोत, त्याचा अभ्यास करुन सांगू असं उत्तर दिलं. जे रुग्ण गरीब होते त्यांच्याकडून डिपॉझिट घेतलं जात नव्हतं. जे रुग्ण भरु शकतात त्यांच्याकडून घेतलं जातं असंही त्यांनी सांगितलं.
हॉस्पिटलचा पालिकेचा टॅक्स कोर्टाच्या आधीन आहे. आम्ही पालिकेचा एक रुपयाही थकलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टात भरतो अशी माहिती त्यांनी दिली. 5.30 तासात रुग्णाला भर्ती करुन घेतलं असतं तर जीव वाचला असता यात काही तथ्य नाही असाही दावा त्यांनी केला.
पैसे मागण्याचे अधिकार कोणाला आहेत? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “आमच्याकडे डॉक्टरांकडून डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही. आमच्या अॅडमिशनच्या पेपरवर खर्चाचं अंदाजपत्रक लिहिलं जातं. हा पेपर प्रत्येक रुग्णाला दिला जातो. त्यावर डिपॉझिटची रक्कम लिहिण्याची पद्धतच नाही. पण त्यादिवशी राहू, केतू काही कारणाने डॉक्टरांच्या डोक्यात आलं आणि कागदावर चौकोन करुन त्यात 10 लाख डिपॉझिट लिहिलं. ही गोष्ट खरी आहे. असं कोणीही लिहित नाही. तुम्ही कोणालाही विचारु शकता. मी रोज इथे 10 शस्त्रक्रिया करतो. पण आजपर्यंत कोणत्याही रुग्णाला असं लिहून दिलेलं नाही. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना विचारु शकता. जर कोणाला डिपॉझिट घ्यायचं असेल तर ते डॉक्टराशी बोलून, समजून या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची हे काही केसमध्ये ठरवलं जातं. या केसमध्ये अशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टराशी बोलून त्यांनी रुग्णाला सांगितलं”.
पुढे ते म्हणाले, “जर रुग्ण प्रशासनातील कोणाकडेही आला असता, तर कदाचित या प्रकरणाला वेगळं वळण लागलं नसतं. फक्त त्यांचा विभाग, त्यांची ओपीडी आणि तिथून रागावून जाणं असं झालं”. तात्काळ दाखल करुन का घतेलं नाही यावर कमिटीचा रिपोर्ट येणार आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही असं सांगत त्यांनी उत्तर देणं टाळलं.
“मला पेशंटच्या नातेवाईकाचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की, ते माझ्याकडे डिपॉजिट मागत आहेत. माझ्याकडे इतकी रक्कम नाही. मी तुमच्याकडे किती रक्कम आहे असं विचारलं. तर त्यांनी मी दोन अडीच लाख भरु शकतो. मी म्हटलं तुम्ही तेवढे भरा, बाकी सूचना मी देतो. ते मी सांगितलेल्या गोष्टीला नाही म्हणणार नाहीत. मी त्यावेळी ऑपरेशन करत होतो. त्यावेळी तेवढंच बोलणं झालं होतं. मला 2 ते 2.15 च्या आसपास फोन आला होता,” असंही त्यांनी सांगितलं.
एखादा रुग्ण ओपोडीत आला, आणि न सांगता केला तर पोलिसांना कळवलं जात नाही. पण जर दाखल झालेला रुग्ण सोडून गेला तर पोलिसांना माहिती दिली जाते असंही त्यांनी स्पष्ट केलं.
डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा –
डॉ. सुश्रुत घैसास (मानद स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ) यांनी आज रोजी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. गेल्या काही दिवसातील सामाजिक पक्षोमामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत, हे त्यांनी नमूद केले निनावी धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर भाषेमधील टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या सहन होण्याच्या परीकडे आहे. हे ही त्यांनी सांगितले. या परिस्थितीमध्ये ते त्यांच्या वैद्यकीय पेशावर पुरेशा प्रमाणात लक्ष केंद्रित करू शकत नाही व त्यामुळे त्यांच्या इतर रुग्णांवर अन्याय होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाय मंगेशकर रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दिली आहे.
या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फौडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे. डॉ. घैसास यांच्या देखरेखीखाली असलेल्या रुग्णांची पर्यायी व्यवस्था योग्य प्रकारे होईपर्यंत (सुमारे 3-4 दिवस) रुग्णालयात काम करण्याची त्यांची विनंती प्रशासनाने मान्य केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.