
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनानंतर 48 तासांनी अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आणि राज्यातील जनतेनं घडणाऱ्या घटनांवर काहीसा नाराजीचा सूर आळवला. सामाजिक कार्यकर्त्या अंदली दमानिया यांनी गुरुवार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी माध्यमांशी संवाद साधताना याचसंदर्भात आपली भूमिकाही स्पष्ट केली. पार्थ पवार यांना मुंढवा भूखंड गैरव्यवहारप्रकरणी क्लीनचीट मिळाल्याच्या चर्चांना उधाण आलं आणि असं काहीही झालं नसल्याची बाब दमानिया यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केली. यावेळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं.
पार्थ पवारांना सहानुभूतीचा फायदा दिला जात आहे का?
वरील प्रश्न विचारला असता, या गोष्टी अतिशय संवेदनशील असून, यात अजित पवारांचं निधन झालं असं म्हणाताना त्यांच्याविरुद्ध माझ्याइतका लढा कोणीही दिला नसेल याचीच आठवण दमानियांनी करून दिली. मात्र, त्यांच्या निधनाचं वृत्त येताच प्रचंड हळहळ वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आताच्या घटकेला दु:ख इतकंच की त्यांच्या घरातली, जवळची , पक्षात काम करणारी माणसं यांना दु:ख का झालं नाही, यांना घाई का झाली? असं म्हणत शपथविधी आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींनी धरलेला वेग पाहता, ‘हिंदू धर्मात आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत असं होत नाही. या शपथविधीमुळं महाराष्ट्रात जो संदेश गेला आहे की घरातली व्यक्ती गेली तरीही कामकाज चालू ठेवायचं असतं हा चुकीचा असून, याचीच खंत वाटते’, असं दमानिया म्हणाल्या.
सध्या जिल्हा परिषद अर्थात झेडपी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एकिकडे इतर पक्ष प्रचार करत असातनाच रोहित पवारांनीही असंच आवाहनाचं ट्विट करत अप्रत्यक्षरित्या मतदारांना आवाहन केलं. हे पाहता, सध्याच्या घडामोडी आणि निवडणुकांचा संबंध आहे का? असा प्रश्न विचारताच ‘यात भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारले. एक म्हणजे राष्ट्रवादीत कायमस्वरुपी फूट पाडली आणि दुसरं म्हणजे त्यांनी आताच्या ZP निवडणुकीत जो राष्ट्रवादी पक्षाला आपलेपणा, आपुलकी मिळाली असती तो आता मिळेल की नाही हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सध्या जनमानसात प्रचंड संताप आहे, तो शपथविधीमुळं….हा भाजपचा डाव होता की काय? असा वारंवार प्रश्न पडतो’, असाच सूर दमानियांनी आळवला. आपल्याला कोणाबद्दल सहानुभूती नाही, मात्र राजकारण इतक्या हीन दर्जावर जाईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र भाजपनं ते सिद्ध केल्याचं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.
सहानुभूतीचं राजकारण करत पार्थ पवारांना त्यातून वाचवलं जाईल का?
न्यायदान आणि सहानुभूती यांचा संबंध नसल्याचं सांगत, ‘कोणत्याही न्यायात सहानुभूतीची खेळी चालत नाही. जे गुन्हे केले आहेत ज्यामध्ये खोटी कंपनी बनवणं, तिचे व्यवहार बदलणं, त्यांचे अधिकार मिळवणं, स्टम्प ड्यूटी वेवर घेणं हा सगळा प्रकार पाहता त्यातून वाचणं पार्थ पवारांना शक्य नाही’ या भूमिकेवर दमानिया ठाम दिसल्या. हातातील पुरावे आणि कागदपत्र दाखवत सहानुभूतीनं या गोष्टी मिटणार नाहीत, मात्र आताच्या घडीला सहानुभूतीची लाट जी राष्ट्रवादीकडे गेली असती ती झेडपी निवडणुकीत वळू नये यासाठी घाईत शपथविधी उरकून घेतला हे स्पष्ट दिसत आहे म्हणत भाजपच्या राजकीय खेळीवर त्यांनी उजेड टाकला.
राष्ट्रवादी संपवण्यासाठी हे केलंय का? दमानियांचा सवाल
‘कुठेतरी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे एका पायावर भाजपमध्ये कधीही जायला तयार. त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी संपवण्यासाठी हे केलंय का? संपली तर आनंदच आहे…. मात्र, त्यात आता संपवण्याचा घाट घातला आहे का? असा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे तो मलाही पडला आहे’, असं सांगताना ज्याप्रमाणं अजित पवारांकडे पार्थ पवार प्रकणी स्पष्टता द्यावी अशी मागणी केली होती त्याप्रमाणं तूर्तास सुनेत्रा पवारांरडे आपण जाणार नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
‘मी आता कोणाकडेही जाणार नाही, खारगे समितीचा अहवाल पाहणं महत्त्वाचं असेल. मुळात महाराष्ट्रात या समित्या बनवणं बंद केलं पाहिजे. या समित्या, कोणाच्यात खरा अहवाल सादर करण्याची धमकच नाही. पुन्हा अहवाल थातुरमातूर निघाला तर न्यायालयातच न्याय मिळेल अशा अपेक्षेनं मी न्यायालयात जाईन. मात्र आताच्या घटकेला सुनेत्रा पवारांना भेटण्याची किंवा कशाचीही माझी इच्छा नाही’, या भूमिकेवर त्या ठाम दिसल्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



