
Ramdas Kadam allegations on Sunil Tatkare: अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावली असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केला आहे. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधी वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडलं. 10 दिवस गेले असते तर काय झालं असतं? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम सुनील तटकरे यांनी केलं असाही आरोप त्यांनी केला आहे.
“अचानक काळ आमच्या दादांना घेऊन गेला. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी शरद पवारांना शह देण्यासाठी जे गलिच्छ राजकारण केलं, ते महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आहे. अजित पवारांची स्मशानातील राखही विझली नव्हती, शांत झाली नव्हती असं असताना वहिनींना मंत्रालयात नेऊन शपथ घ्यायला लावली. दहा दिवस गेले असते तर काय झालं असतं? पण हा माणूस किती चालाख आणि चाणाक्ष आहे पाहा. शरद पवार ताबा घेतील असं त्यांना वाटलं,” अशी जहरी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
अजित पवारांना तटकरेंनीच संपवलं असा आरोप विरोधक करत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “कदाचित तथ्य असेल, कारण तटकरे काहीही करु शकतात. ज्या तटकरेंना मी तिकीट दिलं, भाजपासोबत भांडलो, निवडून आणलं ते माझ्या मुलाला विधानसभेत संपवण्याचा प्रयत्न करतात. सुनील तटकरे काहीही करु शकतात. ते भास्कर जाधवांचे भाऊ आहेत असं मी म्हणेन”.
तटकरेंनी केलेली ही कृती निंदनीय. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. सुनील तटकरे विश्वासघातकी असून ज्यांनी त्यांना मोठ केलं त्यांना संपवण्याचे काम केलं असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे.
तटकरेंकडून अपघाताची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
अजित पवारांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलीय. झी 24 तासच्या ‘टू द पॉईंट विथ कमलेश सुतार’ या कार्यक्रमात तटकरेंनी ही भूमिका मांडली.
“ज्या दिवशी दुर्दैवी अपघात घडला तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने यासंदर्भात खोलवर चौकशी करावी. पहिले दोन दिवस मी प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचीही हीच भूमिका आहे की, केंद्रीय मंत्रालय, राज्य सरकारने ज्या काही अशा दुर्देवी घटना घडत असतात त्यासाठी काम करणाऱ्या तपास यंत्रणांमार्फेत चौकशी लवकरात लवकर करावी. फक्त महाराष्ट्र नाही तर देशाच्या जनतेसमोर वास्तव आणावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आणि जिवलग सहकारी म्हणून माझीही ठामपणे हीच मागणी आहे,” असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
‘सत्यता देश, राज्यातील लोकांसमोर यावी’
तुमचं काय व्यक्तिगत मत आहे असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “एखाद्या बाबतीत काही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर व्यक्तिगत मत राहणं हा विषय नाही. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि सत्यता देश, राज्यातील लोकांसमोर यावी हाच ठाम आग्रम आहे”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



