
महसूल विभागाचे अधिकारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना, रेती तस्करांनी केवळ हुज्जतच घातली नाही, तर अधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० ते ११:३० च्या दरम्यान, मंडळ अधिकारी पृथ्वीराज विठ्ठल अहिर (वय ४७ वर्षे) हे त्यांचे सहकारी महसूल सेवक अमित बावणकर यांच्यासह आपल्या खाजगी कारने (एम.एच. ३६ एच. ६६४९) शासकीय कामासाठी गोळेवाडीकडे जात होते. पहेला-पवनी मुख्य रस्त्यावरील नाल्याजवळ त्यांना एक संशयास्पद ट्रक (क्रमांक एम.एच. ४० बी.जी. ५१७५) येताना दिसला. हा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात विनापरवाना ८ ब्रास रेती अवैधरित्या वाहून नेली जात असल्याचे उघड झाले. कारवाईत अडथळा आणि जीवघेणा हल्ला मंडळ अधिकारी कारवाई करत असतानाच, तिथे एका चारचाकी गाडीने (एम.एच. ०२ ई.ई. ६२८७) ट्रक मालक आणि चालक पोहोचले. त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. इतक्यावरच न थांबता, त्यांनी जबरदस्तीने ट्रक सुरू केला आणि पळवून नेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अधिकाऱ्यांनी आपल्या कारने ट्रकचा पाठलाग केला, तेव्हा ट्रक चालकाने अत्यंत बेजबाबदारपणे ट्रक मागे घेऊन अधिकाऱ्यांच्या कारला डाव्या बाजूने जोरात धडक दिली. या धडकेत कारचा आरसा आणि डोअर वायझर फुटून मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांत गुन्हा दाखल अखेर आरोपींनी संगनमताने धाक दाखवून आणि अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणून तिथून पळ काढला. याप्रकरणी पृथ्वीराज अहिर यांच्या लेखी तक्रारीवरून अड्याळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. १७०/२०२६, कलम ११८(१), ३५२ भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मांदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अड्याळ पोलिस करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




