
औंढा नागनाथ तालुक्यातील अनखळी परिसरातील ५० ब्रास वाळू साठा तहसीलच्या पथकाने सोमवारी ता. १४ जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वाळू तस्करांचे कंबरडेच मोडले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिस विभागाची पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत.
वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शारदा दळवी, औंढ्याचे तहसीलदार हरीष गाडे तर हिंगोली उपविभागात उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्रीकांत भुजबळ, सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे तर कळमनुरी उपविभागात उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जीवककुमार कांबळे यांचे पथक कार्यरत आहे. या शिवाय गावपातळीवर मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथक कार्यरत ठेवण्यात आले असून या पथकाकडून दररोज पहाटे व रात्री उशिरा वाळू घाटाच्या मार्गावर वाहनांची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील अनखळी शिवारात पूर्णा नदीच्या पात्राच्या परिसरात वाळू तस्करांनी वाळू उपसा करून साठा करून ठेवण्याची माहिती तहसीलच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून तहसीलदार हरिष गाडे, मंडळ अधिकारी रंगनाथ म्हैत्रे, केशव अंभोरे, आशा गीते, तलाठी विठ्ठल शेळके, नितीन अंभोरे यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे वाळूचा साठा आढळून आला. या ठिकाणी असलेला ५० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदर साठा कोणी करून ठेवला याचा शोध घेतला जात असून त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.