
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागात नेमणूक असलेल्या कनिष्ठ अभियंत्याला पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (28 फेब्रुवारी) करण्यात आली आहे. सुहास करेंजकर असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
.
प्राप्त माहितीनुसार, करेंजकर हे भंडारा जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून आरओ प्लान्ट बसविण्यात आले होते. त्या कामाचे 9 लाख 80 हजार रुपयांचे बिल थकले होते. कंत्राटदाराने बिल प्रशासनाकडे सादर केले. त्यानंतर करेंजकर यांनी कंत्राटदाराला आठ टक्के रक्कम मागितल्याचा आरोप आहे. सुरुवातीला करेंजकर यांनी मागितलेली रक्कम मोठी होती. परंतु तडजोडीनंतर 40 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजकारणात पकड असलेल्या एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाने सुहास करेंजकर यांची तक्रार केल्याचं सांगण्यात येत आहे.
कनिष्ठ अभियंता महागड्या कारचा शौकीन
लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून कनिष्ठ अभियंता करेंजकर यांच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. सुहास करेंजकर यांना महागड्या कारचा शोक असून ते दरवर्षी नवीन कार खरेदी करायचे. कारचे कोणतेही मॉडेल त्यांनी एका वर्षापेक्षा जास्त काळ वापरले नसल्याचे जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी एसीबीच्या पथकाला सांगितले. तसेच करेंजकर यांच्याकडे चार ते पाच बंगले असल्याची चर्चा भंडारा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे या गैरप्रकाराची तक्रार एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाने केल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.