
गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्यामुळेच गायनात सुवर्णमध्य साधण्याची कला अवगत झाल्याचे ज्येष्ठ गायक पंडित अरुण द्रविड यांनी सांगितले. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे आयोजित ‘परंपरा’ या सांगीतिक मालिकेत ते बोलत होते. सुरांना पारिजातकाच्या फुलांप्रमाणे समजून त्यांना नजाकतीने कुरवाळणे आवश्यक असते, असे किशोरीताई आम्हा शिष्यांना सांगत असत. गाताना केवळ व्याकरणावर लक्ष केंद्रित न करता त्यातील सौंदर्यविचार आणि भावसौंदर्य समजून उमजून गायन करावे, असे त्यांचे मार्गदर्शन होते. पंडित द्रविड यांनी आपला सांगीतिक प्रवास उलगडताना सांगितले की, सर्व घराण्यांचे संगीत ऐकून ते आत्मसात करत आपल्या गायनातून नवीन विचार मांडणे आवश्यक आहे. जयपूर घराण्याच्या गायकीचा पाया भक्कम करण्यात मजीद खाँसाहेब यांचा मोठा वाटा होता. त्यांनी जयपूर घराण्यातील तानांमधील गमक, बलस्थाने आणि आकार लावण्याची तालीम दिली. किशोरीताईंसह त्यांच्या गुरू व आई मोगुबाई कुर्डिकर यांचे देखील मला मार्गदर्शन लाभले. जयपूर घराण्यातील शिस्तबद्ध रागस्वरूप सांभाळत, व्याकरणाचा सखोल अभ्यास करत गायकीतील सौंदर्यविचार आणि कलाकुसर दाखविणे ही सुवर्णमध्य साधण्याची कला किशोरीताईंमुळे माझ्या गायनात आली, असे पंडित द्रविड यांनी नमूद केले. मोगुबाई कुर्डिकर यांची तालीम किशोरीताईंच्या गाण्यात दिसते, त्याचबरोबर किशोरीताईंच्या अंतर्मनातील विचार, भावनात्मकता आणि उत्कटता प्रकर्षाने जाणवते. किशोरीताईंचे माझ्या जीवनातील स्थान सर्वात वरचे असून, पुन्हा जन्म मिळाल्यास मोगुबाईंसह किशोरीताईंकडे शिष्य म्हणून सांगीतिक तालीम घेण्याची इच्छा असल्याचे पंडित द्रविड यांनी व्यक्त केले. आजचे गायक किशोरीताईंच्या गाण्यांची रेकॉर्ड ऐकून त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात; परंतु गाणे हे गुरूमुखीच शिकायचे असते. त्याशिवाय गाण्यात स्वतःची प्रगल्भता आणि आविष्कार उमटत नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. सांगीतिक संवादानंतर पंडित अरुण द्रविड यांची गायन मैफल रंगली. त्यांच्याशी किशोरीताईंचे शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर यांनी संवाद साधला. पंडित द्रविड यांनी जयपूर घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण राग ‘रायसा कानडा’ सादर करून अल्लादिया खाँसाहेब यांची बंदिश ऐकविली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात जयपूर-अत्रौली घराण्याच्या जुई धायगुडे-पांडे यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी श्री राग उलगडून दाखवताना परात्पर गुरू गानसरस्वती किशोरी अमोणकर यांची बंदिश सादर केली आणि द्रुत लयीत बलवंतराय भट यांची रचना ऐकविली. त्यानंतर खेमकल्याण राग सादर करताना अल्लादिया खाँसाहेबांची बंदिश सादर करून मध्यलय तीन तालात किशोरीताईंची बंदिश ऐकविली. गुरू पंडित अरुण द्रविड रचित खेमकल्याणमधील तराणा सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. कलाकारांना ऋषिकेश जगताप (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), सूर गोखले आणि सचिन शशितळ (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



