
Sunil Tatkare To The Point Interview: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याचं उत्तर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आलेलं नाही. प्रफुल्ल पटेल यांनी स्वत: त्यांच्या नावाची चर्चा फेटाळून लावली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्रिपदानंतर या पदावरही विराजमान होत सूत्रं हाती घेतील अशी चर्चा आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झी 24 तासच्या ‘टू द पॉईंट विथ कमलेश सुतार’ मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.
पक्षाचं पुढे काय होणार? असं विचारलं असता सुनील तटकरेंनी सांगितलं की, “पक्ष संघटन मजबूत करणं, दादांनी जो विचार दिला त्याला पुरक काम करणं, वहिनींच्या नेत्त्वात सरकारमध्ये आहोत, त्यामुळे सरकारच्या अनेक वेगळ्या योजना पक्ष संघटना, विधानसभा, विधानपरिषदेतून जनतेपर्यंत पोहोचवणं याला गती द्यायची आहे. दादा नाहीत ही कल्पना आम्हाला कोणाला पचत नाही. पण वहिनींनी धीर दाखवला त्यासोबत राहून पुढील काम करणं कर्तव्य असून त्यादृष्टीने पुढील वाटचाल करु”.
पक्षाचं नेतृत्व कोणाचं असेल यावर त्यांनी उत्तर दिलं की, “यासंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या प्रयत्न झाला. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत स्पष्ट केलं की, ना त्यांचं नाव चर्चेत होतं, ना त्या स्पर्धेत होतो. मीदेखील वारंवार स्पष्ट केलं आहे की, कार्यकर्ते, आमदार, पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे ती बाब होईल”.
“विधीमंडळ नेता निवडीपर्यंतही मला प्रश्न विचारले गेले. बैठकीची प्रक्रिया झाल्यावर मी सांगितलं. पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्या, घटकांच्या, विधीमंडळ सदस्यांच्या, कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत त्या घेऊन पुढील वाटचाल करणार आहोत. पक्षाच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल,” असं सांगत त्यांनी सुनेत्रा पवार अध्यक्ष होतील की नाही यावर उत्तर दिलं. आमदारांची असेल तीच माझी भावना आहे. योग्य वेळी एकमताने निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले.
पार्थ पवार आणि जय पवार यांची काय भूमिका असेल? यावर ते म्हणाले, “ते दोघे तरुण आहेत. दादांचा विचार घेत ते त्यांच्या प्रतीने काम करत आहेत. अशावेळी पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना सोबत देऊन पक्ष उभारणीसाठी एकत्र काम करु. ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक होईल तेव्हा त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल”.
“मला राज्यात यावं असं वाटलं नाही. दादा नाहीत हा मोठा आघात आहे. पण इथे एक चांगली फळी दादांनी आणि आम्ही निर्माण केली आहे. त्यामुळे केंद्रात लोकसभा सदस्य काम करण्यातच मला रस आहे. राज्य पातळीवर संघटन ज्याची जबाबदारी दादांनी विश्वासाने माझ्यावर सोपवली होती, ती विश्वासाने पार पाडणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जे लक्ष द्यावं लागणार आहे ते देईन. राज्याच्या राजकारणात प्रदेशाध्यक्ष म्हणून आहे. सत्तेच्या राजकारणात येण्याची माझी अपेक्षा नाही. आम्ही आणि दादांनी कष्टाने उभं केलं आहे ते पुढे चालू ठेवणं ही प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडेन,” असं तटकरेंनी म्हटलं.
सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत राहू. आमदारांचे प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर मांडू. जर गरज असेल तेव्हा संवाद साधू असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता दिली असल्याने योग्य वेळी चर्चा होईल आणि पक्षाची भूमिका व्यासपीठावर मांडू. ज्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्यासोबत चर्चा करु असं सांगत त्यांनी अर्थखात्यावर भाष्य करु.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



