
दर्यापूर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी गोपाल देविदास चारथळ याच्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) या लाचखोरीचा अहवाल तयार केला असून, तो आज, सोमवारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त होणार आहे. कान्होली (ता. दर्यापूर) येथील जनसुविधा योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे प्रलंबित देयक मंजूर करण्यासाठी चारथळ याने ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. त्याच्यासोबत कान्होली ग्रामपंचायत सदस्य पद्माकर साहेबराव राऊत (वय ५२, रा. कान्होली) आणि खाजगी इसम मोतीराम गोंडुजी कोल्हे (वय ६८, रा. अशोकनगर, दर्यापूर) यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. तक्रारदाराने कान्होली गावात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. एकूण ८ लाख रुपयांच्या बिलापैकी त्यांना ३ लाख ८० हजार रुपये मिळाले होते, परंतु उर्वरित ४ लाख २० हजार रुपये मंजूर करण्यासाठी आरोपींनी ४० हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात १७ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. वाटाघाटीनंतर ३० हजार रुपयांवर व्यवहार ठरला. २५ फेब्रुवारी रोजी दर्यापूर येथील लक्ष्मी झेरॉक्स सेंटरजवळ सापळा रचण्यात आला. आरोपींनी ३० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी दर्यापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने या कारवाईचा अहवाल पोलिसांना दिला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या अहवालाची प्रत मागवली असून, ती प्राप्त होताच चारथळ यांच्यावरील पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल. चारथळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेहरे, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली. शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून लाच मागितल्यास नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



