
Education News : शिक्षण क्षेत्रासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून केंद्रच नव्हे तर राज्य शासनाकडूनही अनेकदा काही महत्त्वाची पावलं उचलली जातात. मात्र याच शिक्षण क्षेत्राचं दाहक वास्तव नुकतंच समोर आलं आहे. महाराष्ट्रात एकिकडे राज्य विकासाच्या दिशेनं झपाझप पावलं टाकत असतानाच शिक्षणाचा मुद्दा आणि त्यातही ज्ञानार्जनासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत मात्र राज्य मागेच असल्याचं स्पष्ट होत आहे.
राज्यातील कोणत्या शाळांमध्ये लाडक्या लेकी वाऱ्यावर?
वस्तूस्थिती आणि अहवालातून समोर आलेल्या वृत्तानुसार राज्यातील 1164 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय नाही. तर, 3328 शाळांमध्ये वीजपुरवठा नसल्याचीही बाब उघड करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या सांख्यिकी अहवालातून ही आकडेवारी समोर आली असून, मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नसणाऱ्या शाळांमध्ये 1043 शासकीय, 64 खासगी अनुदानित, 20 खासगी विनाअनुदानित आणि 37 सेल्फ फायनान्स शाळांचा समावेश आहे.
उपलब्ध माहितीनुसाकर 2024- 2026 दरम्यानच्या कालावधीतील शिक्षण विभागाचा हा अहवाल जानेवारी महिन्यात शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करण्यात आला. त्यातून शाळांमधील हे भीषण वास्तव समोर आलं.
कोणत्या जिल्ह्यात परिस्थिती अतिशय वाईट?
अहवालानुसार मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नसलेल्या सर्वाधिक शाळा बीड जिल्ह्यात असून, ही आकडेवारी आहे 112. हिंगोली, नांदेड, परभणी, गडचिरोली, जळगाव, अमरावती, नाशिक मध्येही अशा काही शाळा आहेत. तर, मुंबई, गोंदिया, कोल्हापूर, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मात्र मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची शंभर टक्के सुविधा आहे असंही हा अहवाल सांगतो.
प्रसाधनगृहांसोबतच वीजपुरवठाही नाही…
पुरेसा वीजपुरवठा नसणाऱ्या शाळांमध्ये 3102 शासकीय, 131 खासगी अनुदानित, 19 विनाअनुदानित आणि 76 सेल्फ फायनान्स शाळांचा समावेश आहे. दरम्यान, आमच्या उच्चस्तरीय बैठकीत शाळांमधील सुविधांबाबतचा हा तपशील पाहता अधोरेखित झालेल्या सुविधांच्या कमतरतेबाबतचा येत्या महिनाभरात संबंधित शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची व्यवस्था केली जाईल, अशी हमी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल यांनी दिली. त्यामुळं आता ही परिस्थिती नेमकी कधी सुधारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



