
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील सातारा-देवळाई परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. या परिसराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका सविता कुलकर्णी यांनी मनपा आयुक्ताकडे केली आहे. सविता कुलकर्णी म्हणाल्या की, सातारा-देवळाई हा परिसर 2016 मध्ये महानगरपालिकेत समाविष्ट झाला. येथील घरे कायदेशीर असून अनेक नागरिकांनी गुंठेवारी नियमितीकरणही केले आहे. असे असूनही, प्रशासनाकडून नियमित पाणीपुरवठा करण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सविता कुलकर्णी म्हणाल्या की, नवीन जलवाहिनीचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उन्हाळा लक्षात घेता नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी महापालिकेने स्वखर्चाने टँकर आणि ड्रमद्वारे पाणी पुरवावे. टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांकडून कोणताही अतिरिक्त कर किंवा शुल्क घेऊ नये. कामात विलंब करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून, त्यातून होणाऱ्या वसुलीतून पाणीपुरवठ्याचा खर्च भागवण्यात यावा. परिसरातील नागरिकांना या भीषण उन्हाळ्यात पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



