
मुंबई20 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाले आहे. आज (रविवार) पहाटे कर्करोगामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून त्या सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठे यांनी शेवटचे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम केले होते. मात्र, आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी ही मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यांनी एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना याबद्दल माहिती दिली होती. त्यात म्हटले होते की, “आरोग्याची समस्या अचानक उद्भवल्यामुळे मालिकेच्या शूटिंग आणि आरोग्यात समतोल साधणे कठीण झाले आहे. त्यामुळे ‘मोनिका’ ही भूमिका साकारताना मला खूप आनंद झाला असला तरी, मला हा प्रवास इथेच थांबवावा लागत आहे.”
प्रिया मराठे यांनी ‘या सुखांनो या’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांनी ‘कसम से’ या मालिकेद्वारे पाऊल ठेवले. त्यानंतर त्या ‘पवित्र रिश्ता’ मध्ये ‘वर्षा’ची भूमिकेत आणि ‘बडे अच्छे लगते है’ मध्ये ‘ज्योती मल्होत्रा’च्या भूमिकेत दिसल्या. या भूमिकांमुळे त्या घराघरांत पोहोचल्या.
प्रिया मराठे यांनी 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी लग्न केले होते. शंतनु मोघे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपे म्हणूनही यांच्याकडे पाहिले जात होते. प्रिया मराठे यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील अनेकांना धक्का बसला असून, चाहते आणि सहकलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited