
Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुककोंडीचा फटका हजारो प्रवाशांना बसला. मंगळवारी सायंकाळी गॅसचा टँकर उलटल्याने या मार्गावरील थांबवण्यात आलेली वाहतूक 32 तासांनंतर सुरु करण्यात गुरुवारी मध्यरात्रीनंतर यश आलं. मात्र या वाहतुककोंडीमध्ये अडकलेल्या अनेकांनी आपल्याकडे खरोखरच पर्यायी मार्ग असता किंवा एखादं हेलिकॉप्टर आलं असतं आणि आपल्याला घेऊन गेलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटणं सहाजिक आहे. मात्र या वाहतुककोंडीत असलेल्या एका व्यक्तीला घ्यायला खरोखरच हेलिकॉप्टर आलं आणि या व्यक्तीने स्वत:ची या त्रासातून सुटका करुन घेतली.
बाहेर पडण्याचे मार्ग हवेत
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुककोंडीतून आता नाही तर थोड्यावेळात सुटू अशी वेडी आशा मनाशी बाळगून तब्बल 8 तास रस्त्यावर वाट पाहिल्यानंतर एका उद्योगपतीने खरोखरच हेलिकॉप्टर मागवलं आणि या वाहतुककोंडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. ट्रॅफिक जॅममधून थेट हेलिकॉप्टरने स्वत:ची सुटका करुन घेणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे डॉ. सुधीर मेहता. ते एक उद्योगजक असून त्यांना आलेला अनुभव त्यांनीच सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. एक्सवर (पूर्वीच्या ट्विटरवर) डॉ. मेहता यांनी केलेल्या पोस्टमध्ये, “एका गॅस टँकरमुळे गेल्या 18 तासांपासून लाखो लोक मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अडकले आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी आपल्याला द्रुतगती मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर पडण्याचे मार्ग आखण्याची गरज आहे, जेणेकरून वाहनांना परत फिरण्याची परवानगी दिली जाऊ शकेल,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
..म्हणून जागोजागी हेलिपॅड बांधा
पुढे आपल्या पोस्टमध्ये डॉ. सुधीर मेहतांनी, “हेलिपॅड बनवण्यासाठी 10 लाख रुपयांपेक्षा कमी खर्च येतो आणि त्यासाठी एक एकरपेक्षा कमी मोकळ्या जागेची आवश्यकता असते. आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतरासाठी द्रुतगती मार्गाजवळ विविध ठिकाणी हे अनिवार्य केले पाहिजे,” असंही सुचवलं आहे “8 तास या वाहतुककोंडीमध्ये अडकल्यानंतर आज पुण्याला परत पोहोचण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल नितीन वालदे (हेलिकॉप्टर चालक) यांचे आभार,” असेही डॉ. मेहता यांनी नमूद केलं आहे.
नक्की वाचा >> ‘टोलचे पैसे परत करा!’ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 32 तासांच्या ट्रॅफिक जॅममुळे राज संतापले; ‘प्रवास किती…’
जीवाशी जुगार खेळण्यासारखा प्रकार
डॉ. सुधीर मेहता हे पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एका मोबॅलिटी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जमिनीवरील वाहतुककोंडीच्या परिस्थितीचे वर्णन करताना डॉ. सुधीर मेहतांनी, “ही मुंबई-पुणे महामार्गाची अवस्था आहे. चुकीच्या बाजूने गाडी चालवणाऱ्यांमुळे पूर्णपणे अराजक माजले आहे. या प्रदेशाची जीवनवाहिनी असलेली कनेक्टिव्हिटी दिवसेंदिवस खराब होत आहे,” अशा शब्दांमध्ये खंत व्यक्त केली आहे. “या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी जुगार खेळण्यासारखे आहे, शिवाय पोहोचायला 7 तास लागतात,” असंही डॉ. सुधीर मेहतांनी नमूद केलं.
नेमका कुठे आणि कसा झाला अपघात?
मंगळवारी संध्याकाळी सुमारे पाच वाजता खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपेलिन गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. गॅस गळती वाढल्याने काही काळ दोन्ही दिशांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आणि वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. रात्री सुमारे साडे दहा वाजण्याच्या सुमारात आडव्या पडलेल्या या अपघातग्रस्त टँकरमधून गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या वाहनात हस्तांतरित करण्यात आला, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले. क्रेनच्या साहाय्याने टँकर हटवल्यानंतर, गुरुवारी पहाटे 1 वाजल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला असून या वाहतुककोंडीचा परिणाम गुरुवारी दुपारी नवी मुंबईत जाणवू लागला आहे. नवी मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुककोंडी झाली आहे.
हेलिकॉप्टर प्रवास कसा केला?
डॉ. सुधीर मेहता हे 8 तास वाहतुककोंडीत अडकल्यानंतर त्यांनी परत मुंबईला परण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी जुहू विमानतळावरुन पुण्यासाठी हेलिकॉप्टरने प्रवास केला. त्यांनी आठ तास वाहतुककोंडीत अडकल्यानंतर पुन्हा मुंबईकडे फिरण्याचा निर्णय घेतला. त्यांनीच वाहुतकोंडीचा कारमध्ये बसून काढलेला फोटोही पोस्ट केला आहे.
This is the state of the #Mumbai #Pune highway . Complete free for all including wrong side driving . The lifeline of connectivity for the region is deteriorating by the day. Travelling on the same is playing roulette on one’s life plus 7 hours to reach . pic.twitter.com/THC8vinmYR
— Dr. Sudhir Mehta (@sudhirmehtapune) February 4, 2026
अनेक प्रसारमाध्यमांनी वाहतुककोंडी असलेल्या एक्सप्रेसवेवरुन अगदी फिल्मी स्टाइलने सुधीर मेहतांना एअरलिफ्ट करण्यात आल्याप्रमाणे वृत्तांकन केलं असून ते चुकीचं असल्याचा दावा करणारी पोस्ट स्वत: डॉ. सुधीर मेहतांनी रिट्विट केली आहे.

डॉ. सुधीर मेहतांचा हा प्रवास चर्चेचा विषय ठरतोय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



