
Bandra Railway Station CCTV Footage: मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमधील भांडणातून काही दिवसांपूर्वी एका प्राध्यापकाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक असाच प्रकार घडला असून या वेळेस एका प्रवाशाला आपला डोळा गमवावा लागला आहे. किरकोळ वादावरुन एका निरपराध व्यक्तीला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी (5 फेब्रुवारी 2026) रात्री सुमारे 11 वाजता वाद्रे स्टेशनवर एका 28 वर्षीय तरुणाला दगड लागून डाव्या डोळ्याची दृष्टी गमावली आहे.
त्या डोळ्याने परत कधीच पाहता येणार नाही
डॉक्टरांनी या प्रवाशाच्या डोळ्यावर जबर मार लागला असून त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी परत येणार नाही. पीडित व्यक्तीचं नाव निशांत रत्नकुमार खत्री असून हा 28 वर्षीय तरुण दादर (पश्चिम) येथील सेनापती बापट मार्गाजवळ मनीष मार्केट येथील रहिवासी आहे. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीए पूर्ण केलेला निशांत साकिनाका येथील एका खासगी कंपनीच्या अकाउंट्स विभागात काम करतो.
दोघांच्या भांडणात कारण नसताना गमावला डोळा
पीडित निशांत रत्नकुमार खत्री सागर टेक प्लाझा येथील ऑफिसमधून काम आटोपून अंधेरी-चर्चगेट फास्ट लोकल ट्रेनने बुधवारी रात्री परत येत होता. ट्रेनच्या डब्यात तिसऱ्या सीटवर बसलेल्या निशांतसमोर ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये भांडण सुरू झाले. एकाने दुसऱ्याला मारण्याची धमकी दिली. वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ट्रेन थांबली तेव्हा एका प्रवाशाने रुळावर उतरून दगड उचलला आणि दुसऱ्यावर फेकला, पण तो ट्रेनला लागला. नंतर त्याने दुसरा दगड उचलून डब्यात फेकला, जो लक्ष्य चुकून निशांत यांच्या डाव्या डोळ्याला लागला. निशांत यांनी सांगितले की, डोळ्यातून रक्त येत असतानाही कोणीही मदत केली नाही. ते रक्त येत असतानाही ट्रेन चालू असतानाच उडी मारून प्लॅटफॉर्मवर उतरले आणि स्टेशन मास्टरच्या ऑफिसपर्यंत रक्त ओघळत चालत गेले. तेथे 45 मिनिटे वाट पाहावी लागली. नंतर भाभा हॉस्पिटलमध्ये निशांतवर उपचार करण्यात आले.
आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा
घटनेनंतर स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण होते. रेल्वे पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्यात दिसलेल्या इसमाबाबत गुप्त बातमीदारांना माहिती दिली असता सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा इसम हा दादर येथे दिसत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण टीमने सापळा लावून त्यास दादर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचाकड़े अधिक विचापूस व चौकशी करून त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव योगेंद्र वंशराज बौध्द असं असल्याचं सांगितलं आरोपी 26 वर्षांचा आहे. आरोपी हा सध्या मुंबईत मजुरी करत असून पालघरमध्ये वास्तव्यास असला तरी मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा आहे.
CCTV Video | किरकोळ कारणावरुन लोकलवर दगडफेक; प्रवाशाने गमावला डोळा वांद्रे स्टेशनवरील घटना CCTV मध्ये कैद#CCTVvideo #locla #bandrarailwaystation pic.twitter.com/vjUJaCeZwy
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 6, 2026
मालाडमधील हत्येनंतर पुन्हा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



