
पुण्यात बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका पेट्रोल पंप व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे हडपसर भागातील रहिवासी असून त्यांचे वस्त्रदालन आहे. आरोपी आणि फिर्यादी व्यावसायिक एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपींनी फिर्यादीला बाटलीबंद शुद्ध पाणी विक्री व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले. यानुसार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्यात भागीदारी करार झाला. या व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादीकडून १ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपये घेण्यात आले. जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बाटलीबंद पाणी विक्री व्यवसायातून मिळालेले ५५ लाख ४८ हजार रुपये आरोपींनी स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पेट्रोल पंप व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक बाबर पुढील तपास करत आहेत. एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांकडून दहा लाखांची फसवणूक एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकासह दोघांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील एका तरुणाच्या मोबाइलवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी सात लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत तरुणाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाईल पाठविली होती. एपीके फाईल उघडल्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्यातून सात लाख ६६ हजार रुपये लांबविले. चोरट्यांनी तरुणाच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात वळविली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत बिबवेवाडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी दोन लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर एका विमान कंपनीच्या नावे बनावट संदेश पाठविला होता. संबंधित संदेश असलेली एपीके फाईल उघडल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख २२ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याला जोडलेला मोबाइल क्रमांक हॅक करुन खात्यातून रोकड काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



