digital products downloads

BLOG: शहराध्यक्ष शत्रुघन यांच्या मार्गात जगतापांचे ‘काटे’ च काटे…!

BLOG: शहराध्यक्ष शत्रुघन यांच्या मार्गात जगतापांचे ‘काटे’ च काटे…!

कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड:  पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 128 पैकी तब्बल 84 जागा जिंकल्यानंतर आणि स्वतः च्या पॅनल मध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर 2017 ला पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास भाजप शहराध्यक्ष शत्रुघन काटे यांना वाटत होता. पण या वेळी ही 2017 च्याच घटनाक्रमांची पुनरावृत्ती झाली आणि महापौर पद पदरात पडले असे वाटत असतानाच त्या जागी रवी लांडगे यांची वर्णी लागली आणि पुन्हा एकदा शत्रुघ्न काटे यांच्या पदरी निराशाच आली. विशेष म्हणजे दोन्ही वेळी काटे यांच्या महापौर पदाच्या स्वप्नामध्ये अडथळा झाले ते ‘जगतापच’…! 2017 मध्ये ही महापौर पदाने हुलकावणी दिली आणि आता ही…!

Add Zee News as a Preferred Source

2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची दशकाहून अधिक काळ असलेली एक हाती सत्ता भाजपने उलथवून टाकली आणि पहिल्यांदाच ७७ जागांवर दमदार विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. तत्कालीन भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचा त्यात मोठा वाटा होता. पहिल्यांदाच सत्ता आल्यानंतर भाजपचा पहिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय म्हणून शत्रुघन काटे यांचे नाव महापौर पदासाठी चांगलेच चर्चेत होते. आमदार महेश लांडगे यांचा ही त्यांना पाठिंबा होता. मुंबईत नरिमन पॉईंट वर शत्रुघन काटे यांना लांडगे यांच्याकडून तशी ग्वाही ही मिळालेली. पण शत्रुघन काटे यांना महापौर पद दिले आणि त्यांची छाप पडली तर चिंचवड विधानसभा मतदार संघात ते संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता लक्षात घेत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेवट पर्यंत काटे यांना झुलवत ठेवले आणि शेवटच्या क्षणी भोसरीच्या नितीन काळजे यांच्या पदरात आपले वजन टाकत त्यांना महापौर म्हणून विराजमान केले. 

त्यानंतर सत्तेच्या संपूर्ण काळात स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळावे यासाठी धडपडणाऱ्या शत्रुघन काटे यांना लक्ष्मण जगताप यांनी शेवट पर्यंत ते पद मिळू दिले नाही. शत्रुघन काटे यांची आर्थिक पार्शवभूमी पाहता स्टँडिंग चे चेअरमन पद तूला देणे म्हणजे स्टँडिंग चा अपमान आहे असं लक्ष्मण जगताप खाजगीत बोलत. चिंचवड मधला संभाव्य उमेदवार हे पक्के माहित झाल्याने लक्ष्मण जगताप यांनी शत्रुघन काटे त्यांच्या गटातले असले तरी त्यांची राजकीय ताकत फार वाढणार नाही या कडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आणि शेवटपर्यंत शत्रुघन काटे यांना महत्वाच्या पदावर विराजमान होऊ दिले नाही.   

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदार संघाची सूत्रे त्यांचेच बंधू शंकर जगताप यांच्याकडे आली. लक्ष्मण जगताप यांना जी शंका वाटत होती, अगदी तेच घडले. चिंचवड विधानसभा मतदार संघात उमेदवारी साठी शंकर जगताप यांना शत्रुघन काटे यांनी टोकाचा विरोध केला. पण पक्षश्रेष्टींनीं शंकर जगताप यांच्या नावाला पसंती दिली. त्यानंतर जगताप काटे एकत्र आल्याचे चित्र दिसले खरे पण ते फक्त वरून वरूनच. आमदारकीला शेरूघन काटे यांनी केलेला विरोध लक्षात ठेवत शंकर जगताप यांनी ही संधी मिळताच शत्रुघन काटे यांच्या पाठीराख्यांना कात्रजचा घाट दाखवलाच पण शत्रुघन काटे यांचे महापौर पदाचे स्वप्न या वेळी ही पूर्ण होऊ दिले नाही. 

या वेळी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी असताना भाजपने 84 जागांपर्यंत मजल मारली. त्यामुळे पक्ष महापौर पदासाठी या वेळी तरी विचार करेल अशी अपेक्षा शत्रुघन काटे करत होते. राष्ट्रवादीचे ताकतवान नेते नाना काटे यांच्या पत्नीला पराभूत करण्यात महत्वाची भूमिका निभावल्याने तर महापौर पद मिळेळच असा विश्वास काटे आणि त्यांच्या पाठीराख्याना होता. महापौर पद जाहीर होण्यापूर्वी जी नावे पुढे येत होती त्यात शत्रुघन काटे यांचे नाव कॉमन होते. पण शेवटी 2017 ची पुनरावृत्ती झालीच. लक्ष्मण नसले तरी शंकर जगताप यांनी सूत्रे फिरवली आणि शत्रुघन आणि महापौरपद या मार्गात ‘काटे’ टाकलेच आणि दुसऱ्यांदा शत्रुघन काटे यांचे महापौर पदाचे स्वप्न भंग पावले…!

(कैलास पुरी हे गेली 20 वर्षाहून अधिक काळ टेलिव्हिजन पत्रकारितेत कार्यरत असून झी 24 तास वाहिनी मध्ये ते 2011 पासून जोडले गेले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील राजकीय सामाजिक विषयांवर ते सातत्याने लिहित असतात..!)

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp