
.
खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. परंतु ऐन मशागतीच्या वेळी पावसाने धुमाकुळ घातल्याने अजूनही शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली नाहीत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च प्रतीचे बियाणे, उत्तम रासायनिक खते व कीटकनाशके मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. तिवसा तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची नियमित तपासणी करण्याची व खते व बियाणे यांचे नमुने काढण्याची मोहीम सध्या कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येत आहे. अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते व औषधींची खरेदी करावी, असे आव्हान तिवसा तालुका कृषी अधिकारी हेमलता इंगळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
कृषी विभागांतर्गत पंचायत समिती तिवसा खरीप हंगामपूर्व निविष्ठा व गुणनियंत्रण आढावा बैठक आणि परवाना धारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी कृषी अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामात बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रकिया करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे उगवण क्षमतेत वाढ होऊन, पिकांची कीड आणि रोगापासून सुटका होईल. विशिष्ट खत अथवा बियाण्यांची साठवणूक करून विक्रीसाठी या कृषी निविष्ठा उपलब्ध नाहीत असे शेतकऱ्यांना सांगणे, एखादी निविष्ठा खरेदी करावयाची असल्यास त्यासोबत दुसरीच अनावश्यक निविष्ठा खरेदी करणे अनिवार्य आहे, अशा प्रकारची लिंकिंग करणे, चढ्या दराने कृषी निविष्ठांची विक्री करणे अथवा योग्य देयक शेतकरी यांना न देणे अशा बाबी कृषी सेवा केंद्राने अनुसरल्यास त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व निविष्ठा विक्रेत्यांना दिला.
कृषी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांकरिता शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक नोंदणी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी सेतू केंद्रात जाऊन शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे. तालुकास्तरीय भरारी पथकाची नेमणूक केलेली आहे. तसेच तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना केलेली आहे. शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करावयाच्या असल्यास अधिकृत कृषी सेवा केंद्रातून खरेदी कराव्यात. तसेच सोयाबीन बियाणे घरचे अथवा बाजारातील विकत घेतले तरीसुद्धा त्याची उगवण क्षमता तपासून व बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी तिवसा यांनी शेतकऱ्यांना केले आहे. शेतकऱ्यांनी एकाच खतावर अवलंबून न राहता इतर खतांचाही योग्य वापर करावा. रासायनिक खतात भेसळ होत असल्यास, बियाणे उगवण होत नसल्यास, फवारणी रिझल्ट येत नसल्यास, पिकांचे नुकसान झाले असल्यास, खते उपलब्ध नसल्यास तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. याचबरोबर निविष्ठांचा उपलब्ध साठा व दर हे सर्व शेतकऱ्यांना दिसतील अशा प्रकारे दुकानाच्या फलकावर दर्शनी भागात प्रदर्शित करणे अनिवार्य केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.