
ज्येष्ठ लेखक व इतिहास संशोधक विश्वास पाटील यांनी औरंगजेबाची कबर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित अवमाननेसंदर्भात निर्माण झालेल्या वादात हस्तक्षेप करत शिवाजी महाराजांच्या जीवावर उठलेल्या मराठा सरदारांची यादी सांगितली आहे. या प्रकरणी विदर्भातील माहूर
.
विश्वास पाटील यासंबंधी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, इतिहासाचे चक्र मोठे विचित्र आहे. विदर्भातील माहूरची रायबागीण देशमुख ही औरंगजेबाची आवडती सरदारीण होती. शिवरायांच्या विरोधात अनेक लढायांमध्ये तिने स्वतः भाग घेऊन तलवार चालवली होती. तर अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला तेव्हा त्याच्या खांद्याला खांदा लावून अनेक मराठा सरदार धावून आले होते. त्यामध्ये मंबाजी भोसले नावाचे शिवरायांचे चुलते होते. जे प्रतापगडच्या 10 नोव्हेंबर 1659 च्या लढाईमध्ये विजापूरकरांच्या खाल्ल्या मिठासाठी ठार झाले.
वाशिम जवळच्या सावरगावच्या उदामराव कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने फारशी भाषेवर त्याकाळी प्रभुत्व मिळविले. त्याच्या अभ्यासाचे दिल्लीचा मुघल बादशहा अकबर याला खूप कौतुक वाटले. अकबराने 1592 मध्ये वाशिम आणि माहूर जवळची 52 गावांची देशमुखी त्याला बहाल केली. तो 1624 च्या भातवडीच्या लढाईमध्ये मोघलांचा सरदार म्हणून शिवरायांचे वडील शहाजी महाराज यांच्याविरुद्ध सुद्धा लढला होता.
बहिणीच्या चोळीची लाज राख
ह्या उदारामच्या मृत्यूनंतर त्याकाळी हरचंद रजपूत नावाचा सरदार माहूरवर चालून आला. तेव्हा “बहिणीच्या चोळीची लाज राख” अशी विनवणी करत त्याची पत्नी रायबागीण ही औरंगजेबाकडे गेली. ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही रायबागणने घोडेस्वारी आणि शस्त्रास्त्रावर जे प्रभुत्व मिळवले होते त्याचे औरंगजेबाला खूप कौतुक वाटायचे. त्याने तिची सरदारकी कायम केलीच.
एवढेच नव्हे तर पुढे जेव्हा शाहीस्ताखान महाराष्ट्रावर चालून आला. तेव्हा त्याने आपला वरिष्ठ सरदार कार्तलबखान व रायबागीण यांची नेमणूक शिवरायांची कोकणातील ठाणी उध्वस्त करण्यासाठी केली. 3 फेब्रुवारी सोळाशे 61 या दिवशी उंबरखिंडीच्या लढाईमध्ये रायबागण स्वतः हजर होती. रायबागणच्या इतिहासाचा समकालीन पुरावा म्हणजे परमानंद स्वामीनी त्याच काळात लिहिलेल्या “शिवभारत” या संस्कृत महाकाव्याच्या 25 व्या आणि 28व्या खंडामध्ये रायबागणच्या या युद्धाचे पूर्ण वर्णन आहे. शिवाय रियासतकार सरदेसाई, बाबासाहेब पुरंदरे, विजयराव देशमुख तसेच आद्य इतिहासकार केळुस्कर गुरुजी अशा अनेकांच्या ग्रंथामध्ये हे सगळे प्रकरण व निर्विवाद पुरावे आढळून येतात. ( तसेच मी माझ्या “महासम्राट रणखैंदळ” या शिवरायांच्या वरील कादंबरीत वरील सर्व प्रकरण खुलासेवार लिहिले आहेच.)
मात्र उदार हृदयाच्या शिवाजीराजांनी तिला माफ केले
उंबरखिंडीनंतर पुढे दहा वर्षांनी म्हणजे सोळाशे 70 मध्ये जेव्हा शिवराय दुसऱ्यांदा सुरतेची लूट घेऊन येत होते. तेव्हा दिंडोरी आणि चांदवड जवळ राजांना अडवून ठार मारण्यासाठी दाऊद खान, महाबतखान अशी मोघल सरदार मंडळी धावून आली होती. त्याचवेळी औरंगजेबाच्या आदेशानुसार रायबागीण देशमुख ही स्वतःचे सैन्य घेऊन शिवरायांना आडवी गेली होती. त्या युद्धामध्ये शिवाजीराजांनी तिचा पराभव करून तिला कैदेही केले होते. दहा वर्षानंतर पुन्हा ती तलवार घेऊन आपल्या विरोधात उभी राहते याचे राजांना खूप कौतुक वाटले होते. मात्र उदार हृदयाच्या शिवाजीराजांनी तिला माफ केले आणि सोडून दिले..
शिवाजी राजांचा समूळ नाश करण्याची शपथ घेऊन जेव्हा अफजलखान चालून आला. तेव्हा त्याला साथ देत प्रतापगडच्या लढाईत शेवटच्या दिवसापर्यंत पुढील बहाद्दर मराठा सरदार विजापूरकरांच्या मिठाला जागले होते. ते म्हणजे मलवडीचे नाईकजी राजे पांढरे, फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर, मसूरचा सुलतानजी जगदाळे, खंडोजी खोपडे, गुंजन मावळचा विठोजी हैबतराव देशमुख, मुधोळचा बाजी घोरपडे, सरदार खराडे, कल्याणजी यादव, झुंजारराव घाटगे, प्रतापराव मोरे, जिवाजी देवकाते, सरदार काटे, पिलाजी मोहिते आणि शंकरजी मोहिते. त्यामध्ये मम्बाजी भोसले नावाचा सरदार म्हणजे शिवरायांचे प्रतापगडच्या युद्धात ठार झालेले चुलते. वरील सर्वांची निर्विवाद यादी इतिहासाच्या अस्सल कागदपत्रांमध्ये किमान 50 ठिकाणी उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी.
त्यांचे जरूर जतन करूया
मुघलांच्या सेवेत मिर्झाराजे जयसिंग हे वयाच्या नवव्या वर्षापासून सहभागी झाले होते. राणा जसवंत सिंग आणि मिर्झाराजे यांनी आयुष्यभर औरंगजेबाची चाकरी करून त्याला मोठे केले. त्याच्या मदतीने व आशीर्वादाने राजस्थानमध्ये मोठ्या दौलती उभ्या केल्या. औरंगजेबा सोबत छोटे-मोठे असे 22 रजपूत सरदार वेगवेगळ्या वेळी शिवाजी व संभाजी राजे यांच्या विरोधात लढले होते. निदान आता या शुभ मुहूर्तावर या सर्व सरदारांच्या समाध्या नेमक्या कुठे आहेत, त्यांचा अभ्यासासाठी तरी शोध घेऊन त्यांचे जरूर जतन करूया!
छत्रपती शिवाजी आणि संभाजी राजांसारखे लोकोत्तर पुरुष या भूमीत पैदा व्हावेत हे या मातीचे भाग्य आहे. पण त्या काळात आज एकमेकाकडे बोट दाखवणाऱ्या मराठा, राजपूत आणि ब्राह्मण वर्गाने, सर्वांनीच अनेकदा फंदफितुरी, दगाबाजी करून या दोघा महान पिता-पुत्रांचे आणि महाराष्ट्र धर्माचे नव्हे तर मानवधर्माचे नुकसान केले आहे. त्यांच्या त्या पुण्यकर्माचे किमान 60-70 ठळक पुरावे मी स्वतः इतिहासाच्या कसोटीवरच दाखवून देईन.
शिवराय आणि संभाजीराजे यांचा स्फूर्तीदायी इतिहास स्फूर्तीसाठी नव्हे तर सर्व राजकीय पक्षांच्या मतपेटीच्या टक्केवारीच्या कीर्तीसाठी उगळला जातो आहे, हेच खरे, असे विश्वास पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.