
मुंबईत 2002-03 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलेला साकिब नाचन पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS)आज सकाळी पडघा (ता. भिवंडी) येथे
.
नाचनच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नाचनने तुरुंगातून सुटल्यानंतर काही तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तो पडघा परिसरात गुप्त शस्त्रप्रशिक्षण देत असल्याची माहितीही तपास यंत्रणांना मिळाली आहे. देशविघातक कृत्य कुठेही घडले की अनेकदा तपासाची सुई भिवंडीतील पडघ्यापर्यंत येऊन पोहचते. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी या भागात राहणारा साकिब नाचन याला काही वर्षांपूर्वी अटक केली होती. तेव्हापासून पडघा नेहमीच चर्चेत राहिला. आज एटीएसकडून साकिब नाचन याच्या घराची झडती घेण्यात आली आहे.
गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा
या ऑपरेशनमुळे संपूर्ण गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परिणामी, गावाने अक्षरशः छावणीचे रूप धारण केले आहे. सकाळपासूनच अनेक संशयित व्यक्तींच्या घरांवर एटीएसची छापेमारी सुरू आहे. याच गावातून कुख्यात साकिब नाचन, त्याचा मुलगा आणि ‘आयसिस’शी संबंधित दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या 16 जणांना अटक करण्यात आली होती. याशिवाय पुण्यातील एका गंभीर प्रकरणात या गावातूनच चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये नेमके किती जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एटीएस अधिकारी यासंदर्भात कोणताही खुलासा करण्यास टाळाटाळ करत आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे
या प्रकरणी याआधी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पडघा, भिवंडी, ठाणे, पुणे आणि बेंगळुरू येथे एकाचवेळी छापे टाकले होते. त्या छाप्यांमध्ये साकिब नाचनसह आणखी काही जणांच्या घरातून शस्त्रे, मोबाइल फोन्स, लॅपटॉप्स, हार्डडिस्क्स आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली होती. काही ठिकाणी हमास या जिहादी संघटनेचे झेंडेही आढळून आले होते.
साकिब नाचन हा मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड
डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या काळात मुंबईत तीन बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 125 जण जखमी झाले आहेत. तिन्ही बॉम्बस्फोटांत साकिब नाचनचे नाव पुढे आले होते. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या सहकार्याने स्फोट घडवून आणल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता. त्याला 10 वर्षांची शिक्षाही झाली.
साकिब नाचनला दोनदा शिक्षा झाली
गुजरातमध्ये 1991च्या दहशतवादी हल्ल्यात साकिब नाचनला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. सुरुवातीला त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, जी नंतर सर्वोच्च न्यायालयाने 10 वर्षांपर्यंत कमी केली. साकिब नाचन 2001 मध्ये सुटला होता.
मुंबई बॉम्बस्फोटात शस्त्रे बाळगल्याबद्दल साकिब नाचनला दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार म्हणजेच पोटा अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात साकिबची 2017 मध्ये सुटका झाली होती. आता पुन्हा एकदा तो एनआयएच्या ताब्यात आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया किंवा आयएसआयएससाठी भारतात नेटवर्क तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
साकिब नाचन हा फायनान्स आणि लीगल हेल्पचे काम पाहायचा
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साकिब नाचन हा इसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलचा म्होरक्या आहे. कल्याणच्या बोरिवली गावात त्याने केंद्र बांधले होते. इथून तो नवीन पोरांची भरती करायचा, त्यांना आर्थिक-कायदेशीर मदत करायचा, प्रशिक्षण द्यायचा. तो ISIS मध्ये सामील होणाऱ्या लोकांना ‘बैयत’ म्हणजेच ISISच्या खलिफाशी निष्ठेची शपथही देत असे. साकिब हा बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ मानला जातो. 2003च्या बॉम्बस्फोटांसाठी त्याने बॉम्ब तयार केले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.