
इंडियन एअरफोर्सचा अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला तपास यंत्रणांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एअरफोर्सचे टी शर्ट, कॉम्बॅट पॅन्ट, शूज, बॅजेस आदी वस्तू जप्त केल्या आहेत. आरोपी उत्तर प्रदेशाचा आहे.
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, गौरव कुमार असे हवाई दलाच्या या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. गुप्तचर यंत्रणेला त्याच्या संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर दक्षिणी कमांडचा मिलिटरी इंटेलिजन्स विभाग व खराडी पोलिसांनी रविवारी खराडी परिसरात राबवलेल्या एका संयुक्त कारवाईत त्याच्या मुसक्या आवळल्या. तपास पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता अनेक संशयास्पद साहित्य सापडले. यात जनतेची दिशाभूल करण्यासाठी तो वापरत असलेल्या हवाई दलाचे 2 टी शर्ट, एक कॉम्बॅट पॅन्ट, एक जोडी कॉम्बॅट शूज, दोन बॅजेस व एक ट्रॅक सूट आदींचा समावेश आहे.
खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपीविरोधात खराडी पोलिस ठाण्यात बीएनएस कलम 168 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. आरोपी नेमका कोणत्या हेतूने आपण एअरफोर्सचा अधिकारी असल्याची बतावणी करत होता? त्याच्या कृत्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका निर्माण झाला आहे का? आदी विविध प्रश्नांची उत्तरे यासंबंधी शोधली जात आहेत. पाकविरोधात हवाई दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर या आरोपीची तोतयागिरी उघड झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सावधगिरीने पाऊले उचलत आहेत.
पाकसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक
दुसरीकडे, पाकसाठी कथित हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणा व पंजाब पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. यात हरियाणाच्या हिसार येथील ट्रॅव्हल व्हॉगर व यूट्यूबर ज्योती मल्होत्रा, कैथलच्या मस्तगढ येथील देवेंद्र सिंग, पंजाबच्या मालेरकोटला येथील अन्य एक मुलगी व एका पुरुषाचा समावेश आहे. कोर्टाने ज्योतील मल्होत्राला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या सर्वांवर पाक अधिकाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा (PIO) ज्योती मल्होत्राला त्यांची हेर बनवण्याचा प्रयत्न करत होते. ती अनेक वेळा पाकिस्तानला गेली होती. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यापूर्वीही ती पाकला गेली होती. याआधी ती चीनलाही गेली होती अशी माहिती आहे. सध्या पोलिस तिच्या आर्थिक व्यवहारांची आणि प्रवासाची चौकशी करत आहेत. ज्योतीला परदेशातून निधी मिळत असल्याचा संशयही पोलिसांना आहे. तपासात असेही आढळून आले की, ती भारतविरोधी कारवायांमध्येही सहभागी होती.
हे ही वाचा…
अमित ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र:पाकिस्तानवर विजय नव्हे युद्धविराम झाला; भाजपच्या ‘विजयोत्सवा’वर व्यक्त केली चिंता
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी ऑपरेशन पाकवरील कथित विजयावर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या सत्ताधारी भाजपसह सर्वच सत्ताधारी पक्षांना खडेबोल सुनावलेत. याविषयी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.