
मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर त्याने मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? असा खडा सवाल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठी – अमराठी वादावर भाष्य करताना उपस्थित केला आहे. त्यांनी यावेळी कोणत
.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज महाराष्ट्र नायक या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी भाषेवरून वाद का घालायचा? असा प्रश्न उपस्थित करत या मुद्यावर आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काहीही झाले तरी हिंदीची सक्ती सहन करणार नाही असे नमूद करत राज्य सरकारच्या त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध केला. त्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शवला. त्यानंतर या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही हिंदी भाषिकांना मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपाल बोलत होते.
महाराष्ट्रातील वादावर तामिळनाडूचे उदाहरण
राज्यपाल म्हणाले, सद्यस्थिती मी वर्तमान पेपरमध्ये वाचतो आहे की, महाराष्ट्रात मराठी बोलले नाही तर तुम्हाला मार खावा लागेल. तामिळनाडूतही भाषेचा वाद झाला होता. मी खासदार होतो. रात्री 9 वा. एक वाद सुरू होता. मी चालकाला कार थांबवण्यास सांगितले. त्यानंतर जमावातील लोक मला पाहून पळून गेले. कदाचित रात्री 9 वा. मी येईन हे त्यांना अपेक्षित नव्हते. जे लोक मार खात होते तिथेच होते. मी त्यांच्याकडून झाल्या प्रकाराची माहिती घेतली. ती माणसे माझ्याशी हिंदीत बोलू लागली. मला ती भाषा येत नाही. मग एका माणसाने मला सांगितले की, यांना तमिळ येत नाही म्हणून मारले.
बाकीचे लोक त्यांना मारत होते. त्यांच्याकडे तमिळ भाषा बोलण्याचा आग्रह धरत होते. त्यानुसार आता मला मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का?
..तर महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का?
राज्यपाल पुढे बोलताना म्हणाले, प्रस्तुत प्रसंगात ज्यांना मारहाण झाली त्यांची मी माफी मागितली. त्यांना जेऊ घातले. ते लोक गेले त्यानंतर मी तेथून निघालो. मी ही घटना सांगत आहे, कारण अशा प्रकारे भाषेच्या नावावर दहशत पसरवली जात असेल, तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? आपण दीर्घ काळासाठी महाराष्ट्राला वेदना देत आहोत. भाषा ही राजकीय पोळी भाजण्याचा मुद्दा नाही. मला हिंदी येत नाही ही बाब अडचणीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील अनेकांना वर काढले आहे. त्यातील 5 टक्के लोकांनाच हिंदी भाषा बोलता येते.
भाषेप्रती सहिष्णु धोरण बाळगण्याची गरज
राज्यपालांनी यावेळी जनतेला भाषेच्या मुद्यावर सहिष्णु धोरण बाळगण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, आत्ता गिरीश महाजन यांनी जे सांगितले तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. मला ती भाषा कळत नाही. मी त्यांच्या चेहऱ्यावरून ते काय बोलत आहेत याचा अंदाज बांधत होतो. मी हे सांगतो आहे, कारण आपल्याला अनेक भाषा शिकता आल्या पाहिजेत. पण त्याचवेळी आपण आपल्या मातृभाषेचा अभिमानही बाळगला पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड करता कामा नये.
माझ्यासाठी माझी मातृभाषा महत्त्वाची आहे. तशीच ती प्रत्येक मराठी माणसासाठीही आहे. आपण भाषेच्या मुद्यावर सहिष्णु वृ्त्ती बाळगली पाहिजे एवढेच माझे सांगणे आहे, असेही राज्यपाल सी पी राधाकृष्णन यावेळी बोलताना म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.