
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. येथील बोदलकसा जलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची नाव अचानक उलटल्याने दोघांचा पाण्यात बुडून करुण मृत्यू झाला. मोहित रहांगडाले आणि कुणाल भोडे (रा. बरबसपुरा) अशी या मृत तरुणांची नावे आहेत. या अनपेक्षित आणि वेदनादायी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एकूण 9 तरुण बोदलकसा जलाशय परिसरात पर्यटनासाठी गेले होते. यावेळी तिथे असलेल्या मच्छीमारांची एक रिकामी नाव या तरुणांना दिसली. उत्साहाच्या भरात या मुलांनी ती नाव घेतली आणि स्वतःच जलाशयात नौकाविहार करण्यास सुरुवात केली. मात्र, किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर जाताच ही नाव अचानक उलटली. या भीषण दुर्घटनेत मोहित आणि कुणाल यांचा बुडून अंत झाला, तर त्यांच्यासोबत असलेले अन्य 7 तरुण सुदैवाने यातून थोडक्यात बचावले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दोघा सख्ख्या भवांचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू तर दुसरीकडे कोकणात पर्यटनासाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला आल्याच्या दोन वेगवेगळ्या धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत घडलेल्या या दुर्दैवी घटनांमध्ये पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे निष्पाप तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या दोन्ही जलसमाधीच्या घटनांमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जगबुडी नदीच्या डोहात बुडून तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. खेड आणि भोस्ते गावाच्या दरम्यान असलेल्या या नदीच्या डोहात चौघे जण पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने ते सर्वजण खोल पाण्यात अडकले. स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य करत एकाला सुखरूप बाहेर काढले. परंतु, आकाश, नरेश आणि कैलास कांबळे या तीन सख्ख्या भावांना वाचवण्यात यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत झाल्याने खेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तारकर्ली येथील समुद्रात दोघे बुडाले दुसरी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली येथे घडली असून, येथे समुद्रात पुण्यातील दोन पर्यटक बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पर्यटनासाठी आलेले हे दोन तरुण तारकर्ली समुद्रात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावून बचावकार्य केले आणि ऋषभ रविकिरण कदम या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. त्याच्यावर सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्याचा मित्र समर्थ गणेश कर्पे (रा. आंबेगाव, पुणे) हा पाण्यात बुडून बेपत्ता झाला आहे. संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा पुढील तपास आणि बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
